Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश राज्यपालांचा विमानातून पायउतार, ठाकरे सरकारचा प्री-प्लॅन

राज्यपालांचा विमानातून पायउतार, ठाकरे सरकारचा प्री-प्लॅन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या विमानाने उत्तराखंडला प्रवास करण्याची परवानगी नाकारल्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. या पार्श्वभूमीवर राजभवनाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार राज्यपालांची बाजू सविस्तरपणे मांडण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी दिलेली नाही असे राजभवनावर कळवल्याचे म्हटले आहे. मात्र राज्यपालांना अर्धवट, अस्पष्ट संदेश देण्यामागे मुख्यमंत्री कार्यालयातील सनदी अधिकारीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील दरी वाढली आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गुरुवारी सकाळी मसुरीला जाण्याकरता राज्य सरकारने विमान नाकारले. त्यांना विमानातून अक्षरशः पायउतार व्हावे लागले. ही निव्वळ तांत्रिक बाब नसून हा ठाकरेंचा प्री-प्लॅन होता हे आता स्पष्ट झाले आहे. राज्यपाल कोश्यारींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट फोन येऊन आर्जव व्हावे यासाठीच हा खास ‘युटी’ प्लॅन होता. त्यात मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांचा समावेश होता. राज्याचे राज्यपाल हे घटनात्मक पद असून या पदावरील व्यक्तीला विशेष अधिकार आहेत. त्यामुळे राज्यपाल हवाई मार्गाने प्रवास करत असताना राजभवनावरील त्यांच्या कार्यालयातून सामान्य प्रशासन विभागाला पत्र पाठवून विमानाची मागणी केली जाते. त्यानुसार विमान आरक्षित झाल्यावर एअर ट्रॅफिक कंट्रोलर उड्डाणासाठी वेळ, दिशा ठरवून देतो. नंतर राज्यपालांसोबत प्रवास करणार्‍या प्रवाशांची एक यादी बनवली जाते. या यादीनुसार विमानाचा फ्लाइट प्लॅन तयार होतो.

यानंतर राज्यपालांसोबत प्रवास करणार्‍या प्रवाशांची एक यादी बनवली जाते. या यादीनुसार विमानाचा फ्लाइट प्लॅन तयार होतो. त्यानंतर या विमानातील कर्मचारी आणि वैमानिक यांची नावे निश्चित करून ती राजभवनला कळवली जातात. विमानाचे आरक्षण झाल्यानंतरच राज्यपाल राजशिष्टाचारानुसार राजभवन सोडतात. राज्यपाल विमानतळावर पोहचल्यावर फ्लाइट प्लॅन नुसार विमान ‘फ्लाईट बे’ वर येते. त्यानंतर या विमानाच्या उड्डाणासाठी एटीसी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोल निर्देश देते.

- Advertisement -

गुरुवारी सकाळी राज्यपाल विमानात बसल्यानंतर तांत्रिक कारणानुसार विमान उड्डाण करणार नसल्याचे वैमानिकाकडून सांगण्यात आले. याबाबत कॅप्टनने एओसीसीला न विचारताच विमान उड्डाण न होण्यासाठी तांत्रिक कारण दिल्याने राज्यपालांना पायउतार व्हायला भाग पाडले गेले. राज्यपालांसारखी घटनात्मक पदावरील व्यक्ती विमानात बसली आणि राज्य सरकारची परवानगी नसल्याने पायउतार झाली हे राज्याच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच घडले आहे. याबाबत हवाई वाहतूक तज्ज्ञांना विचारले असता एका ज्येष्ठ वैमानिकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, जर सरकारने परवानगी दिली नव्हती तर विमान ‘बे’ वर लागलेच कसे? आणि परवानगी नव्हती तर एटीसी परवानगी न देताच विमानाचे दरवाजे कसे उघडले गेले? असे कधीही शक्य नसते. कारण विमान उड्डाणासाठी एक काटेकोर नियमसंहिता असते. ती मोडणे सहज शक्य नसते.’ राज्यपालांच्या या अवमानानंतर ते दुसर्‍या व्यावसायिक विमानाने मसुरीला रवाना झाले. मात्र, त्यानंतर ठाकरे सरकारवर चहुबाजूंनी जोरदार टीका सुरू झाली.

फोनसाठी केले पायउतार
राज्यपालांनी आपल्याला सरकारी विमानासाठी आर्जव करावे, वारंवार आपणच राजभवनाशी का म्हणून सपंर्क करायचा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित अधिकार्‍यांना याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कालच मुलाच्या लग्नात व्यस्त असतानाही विकास खारगे यांनी याबाबतची व्यूहरचना केली. यात त्यांना आशिष कुमार सिंह यांनी मोलाची साथ देत राज्यपाल कोश्यारी यांचा ऐतिहासिक अवमान घडवून आणल्याचे समजते. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आर्जव न करताच कोश्यारी हे मसुरीला आयएएस अकादमीच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यानंतर मंत्रालयात ज्येष्ठ आयएएस अधिकार्‍यांनी राज्यपाल कोश्यारी यांना असलेले राज्य सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेतही लक्षणीय कपात करण्याचे ठरवले आहे.

- Advertisement -

सव्वा वर्ष संवादच नाही
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संबंध हे ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून काहीसे ताठरच बनले आहेत. गेले सव्वा वर्ष या दोघांमध्ये हवा तसा संवादच नाही. शासकीय कार्यक्रमात जसे २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट, २६ नोव्हेंबरला ते कार्यक्रमात एकमेकांना भेटतात. हस्तांदोलन करतात इतकेच. राज्यपाल कोश्यारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसेच उद्धव ठाकरे हे राज्यपाल कोश्यारींना फारसे फोनही करत नाहीत. सर्वसाधारणपणे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात संवाद असेल तरच राज्याचा कारभार नीट हाकला जातो. मात्र विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नेमणुकीच्या प्रस्तावावर अजूनही राज्यपालांनी स्वाक्षरी न केल्याने दोघांमध्येही अढी निर्माण झाली आहे.

कुभांडामागे सनदी अधिकारी
राज्यपाल कोश्यारी यांच्या अवमानानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. याचे गांभीर्य लक्षात येताच मातोश्रीवरील मुख्यमंत्री ठाकरेंच्या निकटवर्तीयांनी विमानाच्या वैमानिकाची झाडाझडती केली. त्याचप्रमाणे या निकटवर्तीयाने एटीसीच्या वजनदार अधिकार्‍यांचीही खरडपट्टी काढली. तसेच या संपूर्ण घटनेत मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी राज्यपालांचे एडीसी संतोषकुमार रस्तोगी यांना अर्धवट, अस्पष्ट निरोप राज्यपालांना दिल्याचा आरोपही केला. मुख्यमंत्र्यांच्या बदनामीसाठी रचलेलं हे कुभांड असल्याचेही त्यांनी सांगितले.

काही कारणाने मला राज्य सरकारचे ते विमान मिळाले नाही. म्हणून मी दुसर्‍या विमानाने प्रवास केला. एक विमान नाही आवडले तर दुसर्‍या विमानाने प्रवास केला. मसुरीतील आयएएस अधिकार्‍यांचा सत्कार हा खासगी दौरा कसा काय असू शकतो? – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्र.

- Advertisement -