घरमहाराष्ट्रमातोश्रीचा पुन्हा धक्का!

मातोश्रीचा पुन्हा धक्का!

Subscribe

तिरुपती बालाजी देवस्थानला भूखंड देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना डावलले

देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान असलेल्या आंध्र प्रदेशातील श्री बालाजीच्या प्रतिरूपाच्या स्थापनेसाठी राज्य सरकारने भूखंड देण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतची कागदपत्रे तिरुपती देवस्थानाकडे सुपूर्द करण्यात आली, मात्र या संपूर्ण भूखंड देण्याच्या प्रक्रियेपासून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जाणीवपूर्वक डावलले आहे.

आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती बालाजीला साकडं घातलं की भक्तांची मनोकामना पूर्ण होते, अशी जगभरातील भक्तांची धारणा आहे. त्यामुळेच अवघ्या जगभरातून श्री बालाजीच्या दर्शनासाठी भक्तगण येत असतात. साहजिकच तिरुपतीचे श्री बालाजी देवस्थान संपूर्ण देशातील श्रीमंत देवस्थान समजले जाते. महाराष्ट्रातील अनेकांना या ठिकाणी जाण्याची इच्छा असूनही वेगवेगळ्या कारणांमुळे जाता येत नाही. अशा भक्तांसाठी श्री तिरुपती बालाजी मंदिराची जशीच्या तशी प्रतिकृती मुंबईच्या आसपास बनविण्यात यावी अशी संकल्पना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली.

- Advertisement -

त्यामुळे नवी मुंबई विमानतळानजीकचा मोक्याचा 10 एकरचा मोठा भूखंड उलवे परिसरात या देवस्थानाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानतळाजवळ असलेल्या या भूखंडाची किंमत हजार कोटींच्या घरात आहे.

मुख्यमंत्र्यांचा भूखंड वितरित करण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कळविण्यात आला. त्यानुसार नगरविकास विभागाचे सचिव भूषण गगराणी यांना याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर मोहर उमटवून अवघ्या दोन महिन्यांतच सुपर एक्स्प्रेस वेगात तिरुपती देवस्थानाला भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला. या भूखंडावर भव्य तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती, गरीब भक्तांसाठी अन्नछत्र, भक्तनिवास, प्रशस्त वाहनतळ, छोटे रुग्णालय, प्रशासकीय कार्यालय अशा अनेक गोष्टी निर्माण करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

भूखंडाचे वितरण परस्पर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते
याबाबतच्या भूखंडाचे देकारपत्र नुकतेच पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ३० एप्रिल रोजी केलेल्या आपल्या तिरुपती दर्शनाच्या भेटीत अध्यक्ष सुब्बाराव रेड्डी यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी तिरुपती देवस्थानाचे विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण, शिर्डी संस्थानचे सदस्य आणि आदित्य ठाकरेंचे मित्र राहुल कुणाल उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या भूखंड वितरणाच्या संपूर्ण प्रक्रियेपासून नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोसो मैल दूर ठेवले होते.

एकाही बैठकीला एकनाथ शिंदे यांना बोलावण्यात आले नव्हते. या भूखंडाचे देकारपत्र न्यासाच्या अध्यक्षांना देतानाही शिंदे यांना नेण्यात आले नव्हते. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाच्या नंतर हा भूखंड तिरुपती देवस्थानला देण्यात येत असल्यामुळे याबाबत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तसेच प्रधान सचिव आदी मंडळींच्या उपस्थितीत देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाला सह्याद्रीवर बोलावून भूखंड देकारपत्र सुपूर्द केले जाईल, अशी नगर विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांची धारणा होती, मात्र श्रेयवादाचे शिकार ठरलेल्या पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी परस्पर जाऊन हे वितरणपत्र देवस्थानाच्या अध्यक्षांना दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षांमध्येही नाराजी आहे.

नगरविकास खात्यावर आदित्य ठाकरे यांचा रिमोट?
गेले अनेक महिने नगरविकास मंत्रालयातील महत्त्वाच्या निर्णयांसंदर्भात आदित्य ठाकरे हे स्वतःच एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन यांच्याशी बैठका करून परस्पर निर्णय घेऊन मोकळे होत असल्याचेही नगरविकास मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपलं महानगरला सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एरवी मुख्यमंत्र्यांकडे असणारे नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले असले तरी कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाच्या फाईल्स आणि निर्णय हे आदित्य ठाकरे यांच्याच माध्यमातून केले जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात मंत्रालयात ऐकायला मिळते. यामुळे शिवसेनेतील आमदार, नेते आणि ठाण्यातील शिवसेनेमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. बालाजी देवस्थानाला दिलेल्या भूखंडाच्या बाबतीत आदित्य ठाकरे यांनी जो प्रकार केला, त्यामुळे ठाणे-मुंबईतील शिवसेनेमध्ये संतप्त भावना आहेत.

मिलिंद नार्वेकरांनाही चार हात दूर
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर सावलीसारखे २८ वर्षे असणार्‍या मिलिंद नार्वेकर यांना चार हात दूर ठेवल्याची शिवसेना, राष्ट्रवादीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास हा प्रामुख्याने मिलिंद नार्वेकर यांच्या चाणक्य नीतीमुळेच शक्य झाला, अशी शिवसैनिकांमध्ये भावना आहे. तरीही मुख्यमंत्रिपद मिळताच सत्तेच्या मुख्य प्रवाहापासून मिलिंद नार्वेकर यांना डावलण्यात येत आहे. तीच गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत होत असल्यामुळे गेले काही महिने शिवसेनेमधल्या गटातटाच्या राजकारणात शिंदे-नार्वेकर यांची युती झाली असल्याचे बोलले जाते. शिवसेनेमध्ये प्रभावशाली चार ते पाच गट आहेत.

यापैकीचा सर्वांत प्रभावशाली गट हा मिलिंद नार्वेकर- एकनाथ शिंदे यांचा समजला जातो. आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी देवस्थानाला भूखंड देण्याच्या प्रक्रियेमध्ये ट्रस्टी मिलिंद नार्वेकर यांची भूमिका ही खूपच महत्त्वाची समजली जाते. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले त्यांचे सख्य लक्षात घेता त्यांना अंधारात ठेवण्याचा निर्णय हा मातोश्रीनेच घेतला गेल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या विशेष कार्य अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता साहेब मीटिंगमध्ये आहेत, बाहेर आले की फोन जोडून देतो, अशा स्वरूपाची माहिती देण्यात आली.

ठाण्याचे शिवसेना नेते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचे प्रदर्शन अवघ्या आठ दिवसांवर आलंय. आयुष्यभर शिवसेना या चार अक्षरांचाच ध्यास घेतलेल्या आनंद दिघे यांच्या लोकप्रियतेवर अंकुश आणण्यासाठी मातोश्रीने योजनाबद्ध प्रयत्न करून त्यांचे खच्चीकरण केले, अशी त्यांच्या समर्थकांची आजही धारणा आहे. स्व.आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनाच्या आठ दिवस आधीच धर्मवीरांच्या तालमीत तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांना मातोश्री दिघेंसारखीच वागणूक देत खच्चीकरण करत असल्याची ठाण्यातील शिवसेनेसह राज्यभरातील शिवसैनिकांची भावना झालेली आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -