Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या; सरकारने ACB ला दिले तपासाचे आदेश

परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या; सरकारने ACB ला दिले तपासाचे आदेश

Related Story

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (Anti Corruption Bureau) परमबीर सिंह यांची खुली चौकशी करण्यासंबंधी आदेश दिले आहेत. पोलीस अधिकारी अनुप डांगे यांच्या तक्रारीसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांचे पब मालकाशी असलेले संबंध आणि त्यांच्यावर टाकण्यात आलेल्या दबावाप्रकरणी, तसेच भष्टाचाराप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. तक्रारीनंतर हे प्रकरण महासंचालक संजय पांडे यांच्याकडे चौकशीसाठी सुपूर्त करण्यात आलं होतं. पण त्यांनी याप्रकरणी चौकशीला नकार दिल्यानंतर आता एका समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही (एसीबी) याप्रकरणी डिस्क्रीट इन्क्वायरीला (गोपनीय चौकशी) सुरूवात केली होती. चौकशीत पुढे आलेल्या काही तथ्यांनंतर याप्रकरणी खुली चौकशी करण्यासाठी एसीबीने गृहविभागाकडे मागणी केली होती, त्यानुसार त्यांना आता परवानगी मिळाली आहे. यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अनुप डांगे यांनी यांनी काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारला पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी एका व्यक्तीने परमबीर सिंह यांचा नातेवाईक असल्याचं सांगत त्यांच्याकडे संपर्क साधला आणि पोलीस दलात पुन्हा रुजु करण्यासाठी २ कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे.

पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी काय आरोप केलेत? 

- Advertisement -

पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी २०१७ मध्ये ब्रिच कँडीजवळील आकृती बिल्डिंगमध्ये असलेला ’डर्टी बर्न्स सोबो’ हा पब रात्री मुदत संपल्यानंतरही चालू असल्याने बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांचा वाद जितेंद्र नवलानीशी झाला. तेव्हा परमबीर सिंग हे अँटिकरप्शनचे महासंचालक होते. त्यांच्याशी ’घरचे संबंध’ असल्याचा दावा करीत जितेंद्र नवलानीने अनुप डांगे यांच्यावर दादागिरी केली. त्याच्या पबमध्ये आलेल्या काही लोकांमध्ये तेवढ्यात वाद झाला. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करताच त्यांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. अखेर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जितेंद्र नवलानीसह तीन आरोपींना अटक करून पोलीस ठाण्यात आणले. अटक झाल्याच्या दुसऱ्याच क्षणी विविध पोलीस अधिकार्‍यांकडून सुटकेसाठी फोन सुरू झाले.

अटक करण्यात आलेल्यांपैकी यश मेहता हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलशी संबंध ठेवण्यावरून अटक झालेला हिरे व्यापारी भरत शहा याचा नातू आहे. मात्र, कोणत्याही दबावाला बळी न पडता डांगे यांनी एफआयआर दाखल केला. त्यानंतर पहाटे स्वत: भरत शहा पोलीस ठाण्यात आले व नातू यशला सोडून देण्याची विनवणी करू लागले. डांगे यांनी नकार देताच भरत शहा, राजीव शहा आणि यश मेहता यांनी डांगे यांच्यावर हल्ला चढवला. गावदेवी पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. या प्रकरणात पोलीस डायरीत परमबीर सिंग यांचाही उल्लेख आहे.

- Advertisement -

हा सारा प्रकार घडल्यानंतर खासकरून जितेंद्र नवलानीचे नाव आरोपींच्या यादीतून काढण्यासाठी परमबीर यांनी प्रचंड दबाव आणला. २९ फेब्रुवारीला मुंबईचे पोलीस आयुक्त झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी अतिरिक्त पोलीस आयुक्त निशिथ मिश्रा आणि पोलीस उपायुक्त राजीव जैन यांना आपल्या कक्षात बोलावून माझे आदेश येईपर्यंत या प्रकरणात आरोपपत्र दाखल करू नका, असे आदेश परमबीर यांनी दिले. तसे इलेक्ट्रॉनिक पुरावे असल्याचे डांगे यांनी तक्रारीत नमूद केले होते. या प्रकरणातील जितेंद्र नवलानी हा अंडरवर्ल्डशी संबंध ठेवून आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मनी लाँडरिंगमध्ये सहभागी आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील आणि इक्बाल मिरची यांच्याशी थेट लिंक असलेले हिरे व्यापारी भरत शहा, सनी देवान आदींशी त्याचे घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप आहे.

जितेंद्र नवलानीला आरोपी केले या एका मुद्द्यावरून सूड उगवत परमबीर यांनी डांगे यांना निलंबित केले. या निलंबनाची निष्पक्ष चौकशी करावी आणि अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या आरोपींना ऑन रेकॉर्ड पाठीशी घालणार्‍या परमबीर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अनुप डांगे यांनी गृह खात्याकडे तक्रारीत केली होती.

 

- Advertisement -