अतिवृष्टीग्रस्तांना १० हजार कोटींची मदत

निर्णयावेळी मंत्री विजय वडेट्टीवार अनभिज्ञ

Kolhapur-Flood

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतल्यानंतर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाची थेट घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे हा निर्णय घेत असताना मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना अनभिज्ञ ठेवण्यात आले.

शरद पवार यांनी काल, मंगळवारी पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत मराठवाडा, विदर्भ तसेच अन्य विभागातील पूरग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याची सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बैठक घेऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याचा निर्णय झाला आणि त्याची माहिती मंत्रिमंडळाला देण्यात आली.

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ अशा पाच महिन्यात अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ही मदत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत असणार आहे.

पूरग्रस्त शेतकर्‍यांना मदत
* जिरायतीसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये
* बागायतीसाठी प्रति हेक्टर १५ हजार रुपये
* बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर २५ हजार रुपये