गृहखात्याचा अजब कारभार, पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अवघ्या १२ तासांत स्थगिती

महाराष्ट्र पोलीस दलातील काल काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, पत्रक काढून १२ तास उलटत नाही तोच पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. अवघ्या काही तासात पोलीस पदोन्नती आदेशाला स्थगिती दिल्यामुळे गृहखात्याचा अजब कारभार समोर आला आहे.

मुंबई आणि ठाण्यातील पोलीस अधीक्षक, पोलिस उपायुक्तांसह पाच जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती. त्याचे आदेश देखील गृहविभागाकडून काढण्यात आले होते. मात्र, पण, १२ तास उलटत नाहीत तोच या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

स्थगिती दिलेल्या अधिकाऱ्यांची नावे –

महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. पण, आज सकाळी त्यांच्या बढती आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

कुठे करण्यात आली होती बढती?

महेश पाटील हे मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त होते. त्यांना मुंबईतील वाहतूक विभागात अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. राजेंद्र माने हे मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त होते. त्यांची ठाण्यातील पूर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. संजय जाधव हे पुणे सुरक्षा पथक महामार्गाचे पोलीस अधीक्षक होते. त्यांना ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली देण्यात आली होती. पंजाबवराव उगले हे ठाण्यातील लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक होते. त्यांना मुंबईच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. दत्तात्रय शिंदे हे पालघरचे पोलीस अधीक्षक होते. त्यांना मुंबई संरक्षण आणि सुरक्षा विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती.

या सरकारने बदल्यांचा पोरखेळ चालू केलाय – अतुल भातखळकर

या सरकारने बदल्यांचा पोरखेळ चालू केला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतात. हे न्यायालयात सुद्धा सिद्ध झाले आहे. या सरकारचा बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड झालेला आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या मुख्यमंत्र्यांच्या सह्यांनी केल्या जातात. आधी गृहमंत्र्यांची सही असते. मात्र, आता १२ तासांत अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे राज्य सरकारने याबाबतचा खुलासा केला पाहीजे. अन्यथा गेल्या वेळी जे वाझे प्रकरण झालं होतं. त्याची ही छोठी आवृत्ती आहे, असं भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले.


हेही वाचा : गुरु तेग बहादूर यांचा ४०० वा प्रकाश पर्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार