मे महिना कसोटीचा, कोरोनावर पावसाळ्याआधी नियंत्रण नाही मिळालं तर…!

corona-virus-30911233_202003390568

राज्यासह देशात कोरोनाचे संकट असताना संपूर्ण देशात सध्या ३ मे पर्यत लॉकडाऊन घेण्यात आला आहे. मात्र मुंबई, ठाणे, पुणे या रेडझोन भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळेच या क्षेत्रातील लॉकडाऊन ३ मे नंतरही सुरूच ठेवण्याची सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने केली आहे. मात्र, सध्या सरकारसमोर महत्वाची कसोटी आहे ती मुंबई, पुण्यासह जे रेड झोन आहेत त्या भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्याची. विशेष म्हणजे मे महिना हा सरकार आणि सर्वच सरकारी यंत्रणेसाठी कसोटीचा राहणार आहे. अवघ्या महिन्याभरावर पावसाळा आला असताना पावसाळ्याआधी काहीही करून मुंबई, पुणे या सारख्या शहरी भागात कोरोनावर नियंत्रण मिळवावे लागणार आहे. त्याचे कारण म्हणजे पावसाळ्यात सर्वाधिक साथीचे आजार असतात आणि याचमुळे काहीही करून पावसाळ्याआधी कोरोनावर नियंत्रण कसे मिळवावे? यासाठी आरोग्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांच्या आरोग्य यंत्रणांसोबत सातत्याने व्हीडिओ कॉन्फरन्सिंग सुरू आहेत. विशेष बाब म्हणजे मुंबईमध्ये दाटीवाटीच्या झोपड्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत जर ही परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर आरोग्य यंत्रणेवर विशेष ताण पडेल.

पुढचे पंधरा दिवस महत्वाचे!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- पुण्यासाठी पुढचे पंधरा दिवस हे खूप महत्वाचे आहेत. पुढच्या पंधरा दिवसांत जर नव्याने लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले तर आणि हे प्रमाण रोखू शकलो तर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात येईल. याचमुळे सरकार देखील ३ मे नंतर पंधरा दिवसांचा आधी लॉकडाऊन घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल. तसेच त्यानंतर सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन पावसाला सुरुवात होण्याआधी आणखी काय नियम कठोर करता येईल? याचा आढावा घेऊनच पावले उचलणार असल्याचे समजते.

जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचा अंदाज!

सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकीकडे राज्य सरकारसमोर कोरोनाचे संकट असताना यंदा पाऊस देखील जूनच्या पहिल्याच आठवड्यात पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ५ जून ते ३० सप्टेंबर हा पावसाचा कालावधी असेल. या कालावधीत ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पावसाळ्यात होणारे आजार

पावसाळा म्हटला की अनेक साथीचे आजार पसरत असतात. यामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, अतिसार अर्थात जुलाब, टायफॉईड, साथीचा ताप, कॉलरा, लेप्टोस्पायरोसिस, पोटाचा संसर्ग, कावीळ हे सर्व आजार पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसून येतात. विशेषत: लहान मुले, वृद्धांची या दिवसांत काळजी घेणे आवश्यक असते.

कोरोना या विषाणूला पावसाळ्यामध्ये पूरक असे वातावरण असते. त्यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच पावसाळा सुरू झाला की हवेतून पसरणारे जंतू वाढतात. त्यामुळे साथीचे आजार देखील पसरतात.

डॉ. अविनाश भोंडवे, महाराष्ट्र अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन