घरताज्या घडामोडीमागेल त्याला ठिबक ! योजनेला मोठ्या अनुदानाचा सरकारचा निर्णय

मागेल त्याला ठिबक ! योजनेला मोठ्या अनुदानाचा सरकारचा निर्णय

Subscribe

अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार

शेतक-यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के व इतर शेतक-यांना ४५ टक्के अनुदान (केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के) कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते. शेतक-यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान व इतर शेतक-यांना ४५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.

- Advertisement -

कोणत्या जिल्ह्यात योजना राबविणार ?

या योजनेमध्ये राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील, शेतकरी आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त अशा एकूण २४६ तालुक्यांचा समावेश होता. शासनाने उर्वरित १०६ तालुक्यांचा समावेश करुन सदर योजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय नुकताच मंत्रीमंडळ बैठकीत घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्वच शेतक-यांना वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे. राज्यामध्ये आतापर्यंत २५.७२ लक्ष हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून, या नवीन योजनेमुळे अधिकाधिक शेतक-यांनी ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता रु.५८९ कोटी रकमेस शासनाची प्रशासकिय मान्यता आहे.

मागेल त्याला ठिबक 

सूक्ष्म सिंचनाची योजना ‘मागेल त्याला ठिबक’ या तत्त्वावर राबविणार असून अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतक-यांना अनुदानाचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे. लाभार्थ्याची पारदर्शकपणे निवड करणेसाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले असून, त्यावर शेतक-यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन योजनेचा लाभ घेता येईल. जास्तीत जास्त शेतक-यांनी आपले अर्ज महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने सादर करून सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -