IAS Transfer : मुंबई : नवीन सरकार आल्यानंतर सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. नवीन वर्षात देखील हे बदल्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यात जवळपास 30 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या आदेशान्वये राज्यातील 13 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी काढले आहेत. मंगळवारी ज्या अधिकाऱ्यांची बदली झाली त्यात प्रवीण दराडे, राहुल कर्डिले, डॉ. प्रशांत नारनवरे आदींचा समावेश आहे. (maharashtra government transfer 13 ias officers)
पर्यावरण विभागातून बदली झाल्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण दराडे यांची बदली सहकार आणि पणन विभागात प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. सध्या सहकार विभागाचा अतिरिक्त कार्यभार नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडे आहे. दराडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी ओळखले जातात.
भारतीय प्रशासकीय सेवेतील 2002 च्या तुकडीचे अधिकारी पंकज कुमार यांची सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2) म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राज्य मानवाधिकार आयोगाचे सचिव नितीन पाटील यांची नियुक्ती नवी मुंबईतील कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजक विभागाच्या आयुक्तपदी झाली आहे.
राज्यपालांच्या सचिव असलेल्या श्वेता सिंघल यांची नियुक्ती अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्तपदी करण्यात आली आहे.
मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि विशेष तपास अधिकारी (2) डॉ. प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती राज्यपालांच्या सचिवपदी झाली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांची नियुक्ती माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजक विभागाचे आयुक्त पी.के. डांगे यांची नियुक्ती राज्य मानवाधिकार आयोगाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.
हेही वाचा – Shivaji Park : खोदकाम करू नका त्यापेक्षा गवताची लागवड करा, प्रदूषण मंडळाचे पालिकेला आदेश
शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव एस. राममूर्थी यांची नियुक्ती राज्यपालांचे उपसचिव म्हणून झाली आहे.
नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची राज्याचे सह करआयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
तर राज्य सह कर आयुक्त म्हणून संभाजीनगर येथे असलेले मिलिंदकुमार साळवे यांची छत्रपती संभाजीनगर येथेच अल्पसंख्याक विभागाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्याण – डोंबिवली स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी सरदेशमुख यांची बदली व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाच्या संचालकपदी केली आहे.
हेही वाचा – Mumbai BMC Budget : उत्पन्न वाढ करताना मुंबई पालिकेची प्रशासकीय खर्चात बचत
गडचिरोली येथील चारमोशी उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन यांची यवतमाळ जिल्ह्यातील केलापूर उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि पांढरकावडा येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.