घरमहाराष्ट्रघोषणा केली पण मोफत धान्य कधी मिळणार?

घोषणा केली पण मोफत धान्य कधी मिळणार?

Subscribe

शिधापत्रिकाधारकांकडून विचारणा; शिधावाटप केंद्रावर धान्य देण्यास नकार

13 एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लावत संचारबंदी जाहीर करण्यात आली. गोरगरिबांचे हाल लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी अन्न सुरक्षा योजनेंतर्गत या महिन्यात मोफत धान्य देण्याचे जाहीर केले होते. मात्र, घोषणा करून आठवडा उलटला तरी नागरिकांना शिधावाटप दुकानांमध्ये धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. अद्याप कोटा आला नाही, आमच्यापर्यंत आदेश आले नाहीत, अशी उत्तरे शिधापत्रिकाधारकांना देण्यात येत आहेत. त्यामुळे ‘आम्हाला धान्य कधी मिळणार’? असा संतप्त प्रश्न शिधापत्रिकाधारकांकडून विचारण्यात येत आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 एप्रिलपासून राज्यात संचारबंदी जाहीर केली. संचारबंदीमुळे रिक्षा, टॅक्सी, कामगार, झोपडपट्टीतील रहिवासी, हातावर पोट असलेले कामगार यांचा रोजगार बंद होणार होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचे 13 एप्रिलला गुढी पाडव्याच्या दिवशीजाहीर केले. त्यानंतर 15 एप्रिलला रात्री आठ वाजल्यापासून राज्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले.

- Advertisement -

राज्यामध्ये 1 कोटी 50 लाख 88 हजार 614 शिधापत्रिकाधारक आहेत. यातील अंत्योदय गटात मोडणार्‍या 24 लाख 31 हजार 220 शिधापत्रिकाधारकांना प्रति माह 35 किलो धान्य मिळते. तर 1 कोटी 26 लाख 57 हजार 394 शिधापत्रिकाधारकांना प्रत्येक महिन्याला प्रति लाभार्थी 5 किलो धान्य मिळते. संचारबंदी जाहीर केल्यानंतर अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिले. तर दुकाने, छोटे कारखाने, खासगी कार्यालये बंद करण्यात आली. यामध्ये काम करणारे कामगार बेरोजगार झाले. त्यामुळे महिना कसाबसा काढण्यासाठी नागरिकांनी सरकारने मोफत जाहीर केलेले धान्य घेण्यासाठी शिधावाटप दुकानांकडे धाव घेतली.

मात्र, दुकानदारांकडून अद्याप आम्हाला मोफत धान्य वाटपासंदर्भात कोणतेही आदेश आले नाहीत, आम्हाला मोफत धान्याचा कोटा आलेला नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येऊ लागली. धान्य कधीपर्यंत येणार असे दुकानदारांना विचारल्यावर आल्यावर कळवण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. धान्य मिळत नसल्याने हतबल झालेल्या नागरिकांसमोर महिना कसा काढायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. संचारबंदीमुळे सरकारी कार्यालयात प्रवेश नसल्याने याबाबत कोणाकडे विचारणा करायची, असा प्रश्नही अनेकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोफत धान्य देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरच लगेचच त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. संचारबंदी जाहीर करण्यापूर्वीच एप्रिलमधील धान्य वाटप सुरू झाले होते. त्यामुळे ज्या शिधापत्रिकाधारकांनी एप्रिलमध्ये विकत धान्य घेतले. त्यांना मे महिन्यामध्ये मोफत धान्य मिळेल. ज्यांनी अद्याप धान्य विकत घेतले नाही, त्यांना या महिन्यामध्येच मोफत धान्य देण्यात येणार आहे.
– कैलास पगारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई

राज्यातील शिधापत्रिकाधारकांची संख्या
अंत्योदय – 24 लाख 31 हजार 220
प्राधान्य कुटुंब – 1 कोटी 26 लाख 57 हजार 394
एकूण – 1 कोटी 50 लाख 88 हजार 614

मुंबईतील शिधापत्रिकाधारकांची संख्या
अंत्योदय – 17 हजार 642
प्राधान्य कुटुंब – 17 लाख 11 हजार 280
एकूण – 17 लाख 28 हजार 922

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -