बारावीची परीक्षा रद्द; उशिरा का होईना पण सरकारला आली जाग

MPSC students demand secondary Services Group B exam postponed, chief minister Uddhav thackeray Arrived For Important Meeting

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातल्या बारावीच्या परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा रद्द करण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. परंतु, उशिरा का होईना सरकारला जाग आली, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांसह पालकांकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसह पालकांच्या म्हणण्यानुसार,‘बारावीच्या परीक्षेबाबत फेब्रुवारीमध्येच निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे सरकारने दुर्लक्ष करत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांची आधीच मानसिकता नव्हती. त्यात राज्य सरकारकडून कोणतेही ठोस निर्णय देखील घेतले जा नव्हते. त्यामुळे काय करावे?’, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांच्या समोर होता. परंतु, आज अखेर निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

ऐन परीक्षा तोंडावर आल्यानंतर निर्णय
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय कधी घेतला जाणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून विचारला जात होता. कारण वर्षभरापेक्षा अधिक काळ विद्यार्थी अभ्यास करत होते. त्यात विशेष म्हणजे सर्व अभ्यास हा ऑनलाईन घेण्यात येत होता. त्यामुळे बर्‍याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करताना प्रचंड अडचणी येत होत्या. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात याव्यात किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात होती. परंतु, राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. कोविड काळात देखील आंदोलने केली. मात्र, राज्य सरकार ऑफलाईन परीक्षा घेतल्या जाणार या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे राज्य सरकारकडून या निर्णयाबाबत चाल ढकल केली जात होती. मात्र, ऐन परीक्षा तोंडावर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

५६.३ टक्के लोकांनी केले निर्णयाचे स्वागत
आरोग्याच्या दृष्टीकोनातून घेतल्या गेलेल्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे ५६.३ टक्के लोकांनी स्वागत केले आहे. तर ५६.६ टक्केे लोकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, असे मत नोंदवले आहे. तर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सर्व्हे झाल्यानंतर महाराष्ट्रातील परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. छत्तीसगडमध्ये याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. तर कर्नाटक आणि ओडिसामध्ये परीक्षा रद्द करण्याच्या वाटेवर आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा होता प्रश्न
‘विद्यार्थ्यांच्या करिअरबरोबर आरोग्यदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ऑफलाईन घेण्यात येणारी परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकली असती. त्यामुळे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. मुलांची मानसिकता पूर्णपणे खालावली आहे. त्यात ऑनलाईन शिक्षण असल्यामुळे आधीच विद्यार्थी त्रस्त झाले होते आणि अशा परिस्थित मुलांना परीक्षेसाठी बाहेर पाठवणे कठीण होते. त्यामुळे परीक्षा रद्द करावी, ही एकच मागणी होती. अखेर परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे’. – जोयस, पालक, वरळी

सरकारने घेतलेला निर्णय योग्य
‘बारावीची परीक्षा रद्द करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र, या निर्णयाला उशीर झाला आहे. परंतु, या निर्णयामुळे सुटकेचा निश्वास टाकला असून पुढील निर्णय घेताना सरकारने वेळेत आणि योग्य घ्यावे’. – जोन्स; विद्यार्थी, विल्सन कॉलेज