Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राज्यात ६४ हजार कोरोना बळींंनंतर, आरोग्य विभागाचा Oxygen Plant चा प्रस्ताव

राज्यात ६४ हजार कोरोना बळींंनंतर, आरोग्य विभागाचा Oxygen Plant चा प्रस्ताव

ऑक्सिजन प्लान्ट, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, रेमडेसिवीरच्या कमतरतेबाबत मदत पुनर्वसन विभागाकडे ७७३ कोटींच्या निधीची केली मागणी

Related Story

- Advertisement -

मार्च २०२० पासून राज्यात सुरू झालेल्या कोविड-19 च्या महामारीने आतापर्यंत ६४ हजारांहून अधिक नागरिकांचे बळी गेले असून आजही राज्यात ७ लाखांहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागाने मागील १४ महिन्यात अतिरिक्त ऑक्सिजनची सोय करण्यासाठी, पीएसए प्लान्ट स्थापन करण्यासाठी, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर खरेदीसाठी, ऑक्सिजन आयात करण्यासाठी आणि रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी २४ एप्रिलला शनिवारी वित्त विभागाला ७४३ कोटी ७२ लाख रुपये निधीचा प्रस्ताव पाठवला ही खात्रीलायक माहिती आहे. मात्र, मागील १४ महिने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव झोपा काढत होते की काय? असा सवाल आता मंत्रालय पातळीवरील सचिव विचारत आहेत. मदत व पुनर्वसन विभागाकडे कोट्यवधीचा निधी पडून असून शनिवारी सादर झालेल्या प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेतला जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘ दै.आपलं महानगर’ला सांगितले.

काय आहे ७४३ कोटी रूपयांचा आरोग्य विभागाचा प्रस्ताव?

आरोग्य सेवेचे आयुक्त एन रामास्वामी यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना राज्य आपत्ती निवारण निधीमधून कोविड-१९ साथीसाठी ७४३ कोटी ७२ लाख रुपये निधी मिळावा असा प्रस्ताव शनिवारी रात्री सादर केला. या प्रस्तावात म्हटल्याप्रमाणे कोविड-१९ च्या रुग्णांच्या उपचारासाठी सद्यस्थितीत ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्ण उपचारासाठी गंभीर अडचणी येत असल्याने वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या हायपॉवर कमिटीने राज्य आपत्ती निधीमधून उपकरणे व औषधांच्या पुरवठ्यासाठी तात्काळ निधी देण्याची मागणी केली आहे. या मागणीमध्ये अतिरिक्त ऑक्सिजनची सोय करणे, ऑक्सिनज पीएसए प्लान्ट उभारणे, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर खरेदी करणे, ऑक्सिजन साठवण्याची क्षमता वाढवणे, ऑक्सिजन आयात करणे आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता करणे यासाठी ७४३ कोटी ७२ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. याच प्रस्तावात एन रामास्वामी यांनी दररोज राज्याला ५०० टन ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे राज्याबाहेरून ऑक्सिजन मागवावा लागतो. सध्या ऑक्सिजनची उपलब्धता नसल्याने ऑक्सिजन बेड्स वाढवता येत नसल्याबाबतची हतबलता व्यक्त केली आहे. तसेच ऑक्सिजन प्लान्टच्या निर्मितीसाठी राज्यातील २३ जिल्हा रुग्णालये, ८ सामान्य रुग्णालये, ९१ उपजिल्हा रुग्णालये आणि १० महापालिका रुग्णालयात ६०० लिटर ते ३५०० लिटर क्षमतेचे पीएसए १३२ प्लान्ट बसवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर हे यंत्र रुग्णाच्या खाटेशेजारी लावता येते. या यंत्रातून प्रति मिनिट ५ लिटर ते १० लिटर ऑक्सिजन प्राप्त होतो. सध्या ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या कोविड -१९ च्या रुग्णांना घरापासून रूग्णवाहिकेपर्यंत आणि रुग्णवाहिकेपासून ते हॉस्पिटलपर्यंत नेण्यासाठी फार मोलाची मदत होईल, असेही एन रामास्वामी यांनी प्रस्तावात म्हटले आहे. तसेच ऑक्सिजनची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी ISO टँक आणि नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अकोला आणि नागपूर या ठिकाणी वाटप केल्यास जिल्हा स्तरावरील रूग्णालयाचे ऑक्सिजन टँक भरले जातील. तसेच कमी पडणार्‍या ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता, ऑक्सिजन आयात करावा लागण्याची शक्यता आहे, असे प्रस्तावात म्हटले आहे.

प्रस्तावात कोणत्या गोष्टींची खरेदी?

सध्या राज्यात दररोज ७० हजार कोविडचे रूग्ण आढळून येतात. त्यातील ६० हजार रूग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता असते. केंद्र सरकार दररोज राज्याला २५ हजार व्हायल पुरवठा करते. त्यामुळे राज्यात दररोज ३५ हजार व्हायल रेमडेसिवीरची आवश्यकता आहे, असेही एन रामास्वामी यांनी पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. यातील पीएस प्लान्टसाठी २०० कोटी ४० हजार ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरसाठी २७२ कोटी, २७ आयएएस टँक खरेदीसाठी १० कोटी, २५ हजार टन ऑक्सिजन टनसाठी १०० कोटी आणि रेमडेसिवीर १० लाख व्हायल आयात करण्यासाठी १६० कोटी अशी मिळून ७४३ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे एन रामास्वामी यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्था वेंटीलेटरवर गेली – प्रवीण दरेकर

- Advertisement -

राज्यातील कोविड आपत्कालीन परिस्थिती गंभीर असल्यामुळे तात्काळ या निधीला मान्यता देण्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव यांना हा प्रस्ताव पाठवून निधीची मागणी केली आहे. मात्र, मागील १४ महिने कोरोनाच्या महामारीनंतरही राज्याचा आरोग्य विभाग कुंभकर्णाची झोप काढत होता का? ६४ हजार लोकांचे बळी गेल्यानंतर आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यासाठी, रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी प्रस्ताव पाठवला जातो. आता या प्रस्तावावर बैठकांचे सत्र सुरू होईल आणि लोकांचे जीव जातच राहतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यातून बाहेर येऊन आरोग्य विभागात जाऊन जर बैठक घेतली तर राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर गेली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. राज्यातील ६४ हजार नागरिकांचा जीव गेल्यानंतर ठाकरे सरकारच्या आरोग्य विभागाला आता जाग येते यापेक्षा दुर्दैव काय असेही ते म्हणाले.

मदत व पुर्नवसन विभाग तत्काळ निधी देणार – विजय वडेट्टीवार

दरम्यान मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आमच्याकडे आपत्ती निवारण निधी हा जिल्हाधिकारी आणि आयुक्तांच्या मागणीनुसार दिला जातो. आरोग्य विभागाने याबाबतचा प्रस्ताव आमच्याकडे अजून सादर केलेला नाही. तो मिळवल्यावर आरोग्य विभागाने मागितलेला निधी तात्काळ दिला जाईल. आमच्या खात्याकडून दिरंगाई होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दै.‘आपलं महानगर’शी बोलताना दिले.

प्रस्ताव आवश्यक निधी (कोटी रुपये)
पीएसए प्लान्ट (१३२) बसविणे २००.८०
ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर ४०७०१ खरेदी २७२.१२
२७ आयएसए टँक खरेदी १०.८०
२५००० टन ऑक्सिजन आयात १००.००
रेमडेसिवीर इंजेक्शन १० लाख आयात १६०.००

(एकूण ७४३.७२)

काय आहे प्रस्ताव ?

-राज्यातील १३२ हॉस्पिटलसाठी पीएसए प्लान्ट
-४०७०१ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची खरेदी
-ऑक्सिजन साठवणुकीसाठी २१ टन क्षमतेच्या २७ टँकरची खरेदी
-२५००० टन ऑक्सिजन आयात करण्याचे प्रस्तावित
-१० लाख रेमडेसिवीर इंजेक्शन आयात करणार

मागील तीन दिवस सतत दै. आपलं महानगरने ‘आतल्या बातम्या’ देऊन राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास ठिम्म, उदासीन, नकारात्मक, बेशिस्त आणि जनतेच्या जीवावर उलटलेला कारभार चव्हाट्यावर मांडला होता. त्यामुळे कुंभकर्णाच्या झोपेत सुस्त पडलेल्या आरोग्य विभागाला जाग आली असून आता विविध साधनांच्या खरेदीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

‘आपल महानगर’चा आरोग्य यंत्रणेच्या त्रुटींबाबतचा पाठपुरावा 

 

राज्यात गेल्या वर्षभरात ऑक्सिजनचा एकही प्लान्ट नाही (शुक्रवार, २३ एप्रिल)

not single oxygen plant
प्रदीप व्यास नकारात्मक असल्याने २२ मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार (शनिवार, २४ एप्रिल)
महाराष्ट्राचा व्हिलन कोण?

mah velen
ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर खरेदी अडकली मंत्रालय लालफितीत! (रविवार, २५ एप्रिल)

red tape oxygen plant


 

- Advertisement -