मुंबई : दरवर्षी साधारणपणे दिवाळीच्या सुमारास थंडीला सुरुवात होते. मात्र, यावेळी उशिराने थंडीला सुरुवात झाली. असे असले तरी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किमान तापमानात अतिशय वेगाने घसरण होताना दिसत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. मात्र वाढत्या हवामानामुळे राज्याला हुडहुडी भरली आहे, तर मुंबईत आतापर्यंतचे नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. (Maharashtra is gripped by cold and Mumbai records lowest temperature ever)
गेल्या चार दिवसांपासून मुंबईत थंडीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सलग चार दिवस मुंबईच्या किमान तापमानाचा पारा 16 ते 18 अंश इतका आहे. त्यामुळे दुपारीही पंखे, कूलर आणि एसी तात्पुरते बंद ठेवावे लागत आहेत. गुरुवारची रात्रीही मुंबईकरांसाठी गारेगार ठरली. महत्त्वाचे म्हणजे शुक्रवारी नोंद झालेले 16 अंश हे चालू मोसमातील आतापर्यंतचे नीचांकी किमान तापमान ठरले आहे. 2016 साली नोव्हेंबर महिन्यात 16.3 अंशाची नोंद झाली होती. तर 16 नोव्हेंबर 1950 रोजी 13.3 अंशाची नोंद झाली होती, अशी माहिती वेगरिज ऑफ दी वेदरकडून देण्यात आली आहे. तसेच मुंबईसह उपनगरात आणखी दोन दिवस किमान तापमानाचा पारा खाली राहील, असी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा – Ajit Pawar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीबाबत काय निर्णय झाला? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
राज्यभरातील शहरांच्या किमान तापमानाचा पारा आता 10 अंशाखाली उतरल्याने राज्यालाही हुडहुडी भरली आहे. पुण्यातील तापमान हे 9 डिग्री अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचले असून त्या पाठोपाठ धाराशिव, नाशिकमधील निफाड आणि जळगाव या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी पारा 10.6 अंशांपर्यंत खाली आला होता, तर कमाल तापमान 28.2 अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे ऊन पडले तरी दिवसभर हवेत गारवा जाणवत असल्याने नागरिक स्वेटर, कानटोपी, मफलर घालून घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे.
राज्यात कुठे किती तापमान?
मुंबई : 16
ठाणे : 20.4
डहाणू : 18.1
रत्नागिरी : 17.3
नाशिक : 10.6
महाबळेश्वर : 10.5
पुणे : 9.5
सोलापूर : 12.8
कोल्हापूर : 15
माथेरान : 14
धाराशिव : 8.3
सातारा : 12.2
छत्रपती संभाजीनगर : 10.6