बेळगावातील आंदोलनावर महाराष्ट्रातील नेते म्हणतात…

बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. कन्नड रक्षण वेदिकाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हिरेबागवाडी येथे महाराष्ट्राचे ट्रक रोखून धरले आहेत.

बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. कन्नड रक्षण वेदिकाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हिरेबागवाडी येथे महाराष्ट्राचे ट्रक रोखून धरले आहेत. कार्यकर्ते कन्नड रक्षण वेदिकेचे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी करत आहेत. ट्रकच्या टपावर चढून आंदोलन करत आहेत. कर्नाटकच्या या महाराष्ट्रातील नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे म्हटले. “कर्नाटककडून महाराष्ट्रातील ट्रकवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. सीमावाद हा सर्वोच्च न्यायालयात असून, दोन्ही राज्यांनी आपली स्वत:ची बाजू भक्कम मांडली पाहिजे. सामंजस्याची भूमिका महाराष्ट्र सरकार घेत आहे. तसेच, महाराष्ट्राच्या जनेतेचा कोणी अंत पाहू नये, अशी माझी विनंती आहे. या हल्ल्यामागे कर्नाटक सरकारने तातडीने लक्ष घालावे. ज्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला असेल, त्यांच्यावर कारवाई करावी. हा वाद सर्वोच्च न्यायालयात असून, न्यायालय जो निर्णय देईल तो दोन्ही राज्यांना मान्य करणे गरजेचे आहे. पण दुसऱ्या राज्याला उसकावण्याचे काम करू नये. कर्नाटक सरकारने हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करावी”, असे उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

“महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकमध्ये हल्ला झाला त्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. आणि आजच्या दिवसाला गालबोट लागू नये. आमच्या जाण्याने लोकांच्या सामजाच्या भावनांना ठेच पोहोचू नये. यासाठी आम्ही दोन्ही मत्र्यांनी आजचा दौरा पुढे ढकलला. महाराष्ट्र राज्य संयमाची भूमिता घेत असताना कर्नाटकमध्ये जर महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली जात आहे तर ती निंदनीय आहे. या हल्ल्याप्रकरणी मी कर्नाटकच्या पोलिसांशी बोलणार असून याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. तसेच या हल्ल्याचे पडसाद इतर ठिकाणी उमटणार नाही याची काळजी कर्नाटक सरकारने घ्यावी. तसेच या प्रकरणी केंद्रातील मंत्र्यांशीही बातचीत करण्यात आहोत”, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

“छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हणण्याचा कायमचा हक्क भाजपाने गमावलेला आहे. ते सातत्याने खालची भूमीका घेत आहेत. हे महारष्ट्रातील सरकार दिल्ली पुढेही गुडघे टेकतात. हा सीमावाद सर्वोच्च न्यायालयात असून, न्यायालयानेही या हल्ल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या मुळावर घावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. या हल्ल्याला सरकारचा पाठींबा आहे. या मिंदे सरकारमुळे महाराष्ट्राचा सत्यानाश होत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचाही सत्यानाश होत आहे. हे सर्व सत्ताकेंद्रीत राजकारण आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी केले जात आहे”, असे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले.

“महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ले केले जात असतील तर ही बाब अतीशय गंभीर आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोतचीत केली. राज्य शासनाने हा विषय अतिषय गांभीर्याने घेतलेला आहे. त्यामुळे मला वाटते की हातघाईवर येऊन चालणार नाही. आपण काय करतो हे पाहायला हवे. आपण एकमेकावंर शत्रुंसारखे हल्ले करायचे का, या सीमावादा प्रकरणी सर्वोच्च न्यायालया जो निर्णय देईल, तो दोन्ही सरकारला मान्य करणे गरजेचे आहे”, राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटले.


हेही वाचा – सीमावाद पेटला : कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्राच्या ६ वाहनांवर हल्ला