Homeमहाराष्ट्रMaharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला का लागले वादाचे गालबोट? वाचा...

Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला का लागले वादाचे गालबोट? वाचा सविस्तर

Subscribe

महाराष्ट्र केसरी 2025 या स्पर्धेमध्ये पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ याला विजयी करण्यात आले. पण या स्पर्धेत झालेल्या वादामुळे या स्पर्धेला गालबोट लागले.

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत मागील चार दिवसांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (ता. 02 फेब्रुवारी) कुस्ती स्पर्धेचे अंतिम सामने खेळविण्यात आले. ज्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना पैलवान पृथ्वीराज मोहोळ वि. शिवराज राक्षे असा झाला. त्यानंतर या फेरीत विजयी झालेल्या पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाडसोबत चार हात केले. यामध्ये पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळने सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड याच्यावर विजय मिळवला. रंगतदार झालेले कुस्तीचे हे सामने खेळामुळे नव्हे तर वादामुळे चर्चेचा विषय बनले आहेत. (Maharashtra Kesari 2025 Why the contest became controversial)

रविवारी, अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत कुस्तीच्या सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यांना पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ व अन्य नेतेमंडळी उपस्थित होती. त्यासोबतच संपूर्ण मैदान कुस्तीप्रेमींनी भरले होते. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे आमनेसाने आले. यावेळी सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना पृथ्वीराजने दोन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षेला खाली पाडले. यावेळी शिवराज याच्या पाठीचा उजवा भाग मॅटला लागला होता. परंतु, पूर्ण पाठ टेकलेली नव्हती, त्याचवेळी त्याला पंचाने पराभूत घोषित केले आणि पृथ्वीराजला विजयी घोषित केले.

हेही वाचा… Chandrahar Patil : “शिवराजने पंचाला लाथ मारणे चुकीचे होते, त्याने खरेतर…”, चंद्रहार पाटील संतापले

पंचांनी दिलेल्या निर्णयाशी असहमती दाखवत शिवराज राक्षे याने रिप्लेची मागणी केली. परंतु, पंचांनी ते अमान्य करत राक्षे पराभूत असल्याचेच म्हटले. पंचांच्या या निर्णयामुळे शिवराज संतापला. यावेळी मोठा वाद झाला. याच रागातून पैलवान शिवराज राक्षेने पंचाची कॉलर पकडली अन् त्यांच्या छातीत लाथ मारली. यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत पैलवान शिवराज राक्षे म्हणाला की, पंचाने विरोधी मल्लाला विजयी घोषित केले, तेव्हा मी या निर्णयावर आक्षेप नोंदविला होता. आक्षेपानंतर कुस्तीचा निर्णय देता येत नाही. मात्र, माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाले. मल्लाचे दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले असेल तरच त्याला पराभूत घोषित केले जाते. माझे दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले नव्हते आणि जर खांदे जमिनीवर टेकल्याचे चित्रीकरणात दिसले तर मी हार मानायला तयार आहे. आम्ही या स्पर्धेसाठी वर्षभर मेहनत घेतो, पंचांनी माझ्यावर अन्याय केला, असे शिवराज राक्षेकडून सांगण्यात आले.

उपांत्य फेरीत पैलवान पृथ्वीराज मोहोळ जिंकल्यानंतर अंतिम फेरीत सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड याच्यासोबत त्याचा सामना झाला. लढत अखेरच्या मिनिटांत असताना चढाओढीत महेंद्र गायकवाडला पंचांकडून ताकिद देण्यात आली. यावेळी पृथ्वीराज मोहोळने थोडा चपळपणा दाखवत महेंद्र गायकवाडला ताकदीने कक्षाच्या बाहेर नेत एका गुणाची कमाई केली. याच गुणावर महेंद्र गायकवाड आणि त्याच्या संघाने आक्षेप घेतला. लढतीची 16 सेकंद राहिली असताना पृथ्वीराज मोहोळ 2-1 असा आघाडीवर होता. त्याक्षणी आक्षेप फेटाळल्याने महेंद्र गायकवाड मॅटवरून बाहेर पडला आणि पुन्हा परतलाच नाही. ज्यामुळे पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी किताब देण्यात आला. पण सामन्यानंतर मैदानाबाहेर गायकवाडच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. ज्यामुळे पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांवर लाठीचार्ज केला.

पैलवान शिवराज राक्षेने केलेले गैरवर्तन आणि सामना संपण्याआत पैलवान महेंद्र गायकवाडने सोडलेले मैदान यामुळे कुस्तीगीर संघटनेकडून दोघांवरही तीन वर्षांची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण यावेळी पृथ्वीराज मोहोळच्या विजयानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि त्याला खांद्यावर घेऊन आखाड्यातच त्याची मिरवणूक काढली. पृथ्वीराज मोहोळ याने विजयानंतर आनंद व्यक्त केला. या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते चांदीची गदा देऊन पृथ्वीराज मोहोळचा सन्मान केला. तसेच त्याला थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.