राज्यसभेच्या धामधुमीत विधान परिषदेची लगीनघाई; एकनाथ खडसे, सचिन अहिर, प्रवीण दरेकर यांच्या उमेदवारीची चर्चा  

विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे  प्रत्येकी दोन तर भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, आघाडी किंवा भाजपने अतिरिक्त उमेदवार दिल्यास विधान परिषदेसाठी निवडणूक अटळ ठरेल.

mahavikas aghadi government Announced maharashtra monsoon session held in july 2022
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर, राज्य मंत्रिमंडळात निर्णय

राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha elections) धामधूम सुरु असताना आता विधान परिषदेची (maharashtra Legislative Council election) लगीनघाई सुरु झाली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

शिवसेनेकडून यांच्या नावाची चर्चा

शिवसेनेत विधान परिषदेसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्यासह माजी मंत्री सचिन अहिर (Sachin Ahir), नंदूरबारचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी (Amsha Padvi) यांच्या नावाची चर्चा आहे. दिवाकर रावते यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता दिसत नाही. शिवाय सुभाष देसाई यांच्या उमेदवारीबद्दल शिवसेनेत संभ्रम आहे. राज्यसभेप्रमाणेच शिवसेना ग्रामीण भागातील एखाद्या शिवसैनिकाला संधी देण्याची शक्यता आहे.

कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी?

राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे नाव निश्चित मानले जात  आहे. याशिवाय विधान परिषदेचे मावळते सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar), अमरसिंह पंडित (Amarsingh Pandit), संजय दौंड यांच्या नावाची चर्चा आहे.  काँग्रेसकडून भाई जगताप, नसीम खान, सचिन सावंत, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे यांची नावे दिल्लीला पाठवल्याचे समजते. भाजपकडून विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते. मुंबई महापलिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय समाजाचे नेते आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. याशिवाय पंकजा मुंडे, सुजितसिंह ठाकूर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.

गुप्त मतदान असल्याने कसोटी

विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे  प्रत्येकी दोन तर भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, आघाडी किंवा भाजपने अतिरिक्त उमेदवार दिल्यास विधान परिषदेसाठी निवडणूक अटळ ठरेल. विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असल्याने ही निवडणूक आघाडी आणि भाजपसाठी कसोटीची ठरणार आहे

विधान परिषदेतून निवृत्त होणारे सदस्य

भाजप : प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे आणि  रामनिवास सत्यनारायण सिंह (सिंह यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे )
 शिवसेना  : सुभाष देसाई आणि  दिवाकर रावते
 राष्ट्रवादी कॉंग्रेस  : रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड


निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : ९ जून
उमेदवारी अर्जांची छाननी : १० जून
अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस : १३ जून
मतदान :  २० जून
मतमोजणी:  २० जून,  संध्याकाळी ५ वाजता