घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीकडून बाबाजानी दुर्राणी इन, नरेंद्र पाटील आऊट

राष्ट्रवादीकडून बाबाजानी दुर्राणी इन, नरेंद्र पाटील आऊट

Subscribe

विधानसभा सदस्यांद्वारा निर्वाचित होणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच...

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी मतदान होणार असून अर्ज भरण्यासाठी ५ जुलै ही शेवटची तारिख आहे. प्रत्येक पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी आता आपला मोर्चा नागपूरकडे वळवलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार निवृत्त होत असून यावेळी केवळ एक आमदार पक्षाला निवडूण आणता येणार आहे. हा एक आमदार कोण असणार?यावरुन पक्षातंर्गत अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आज नागपूरात पोहोचले असून उद्या ते निवडणूक अर्ज भरतील अशी माहिती पक्षातील खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे निवृत्त होत असलेले नरेंद्र पाटील आता कोणती भूमिका घेणार? भाजपकडून त्यांना खरंच उमेदवारी मिळणार की ते राष्ट्रवादीतच राहणार? याचे चित्र दोन दिवसांत स्पष्ट होईल.

विधान परिषदेचे ११ सदस्य २७ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या जागांसाठी १६ जुलै रोजी नागपुरात विधानसभा सदस्याद्वारा मतदान होणार आहे. विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता भाजप पाच, शिवसेना तीन तर काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा आरामात निवडूण आणू शकतात. मागच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीने सभापती रामराजे नाईक निबांळकर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसची मदत घेतली होती. त्यामुळे या निवडणूकीत काँग्रेसला दोन जागा निवडूण आणण्यासाठी राष्ट्रवादीला मदत करायची आहे.

- Advertisement -

बाबाजानी पक्षाचे परभणीतील महत्त्वाचे नेते

बाबाजानी दुर्राणी यापुर्वीही विधानपरिषदेचे आमदार होते. काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेसाठी स्थानिक स्वराज संस्थाच्या मतदारसंघातून निवडणूक झाली. तेव्हा परभणी-हिंगोली मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्यामुळे त्यांना निवडणूक लढवता आली नव्हती. मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आता बाबाजानी दुर्राणी यांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. पाथरी नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे २१ पैकी २१ नगरसेवक निवडूण आणण्याचे काम त्यांनी केलेले आहे. पाथरी तालुक्यावर त्यांचे एकहाती वर्चस्व आहे.

नाराज नरेंद्र पाटील भाजपच्या मार्गावर?

माथाडी कामगारांचे नेते आणि आता निवृत्त होत असलेले आमदार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. पक्षांतर्गतही ही चर्चा उघडपणे केली जात आहे. केवळ एकच जागा निवडूण आणण्याच्या अडचणीमुळे उमेदवारी न मिळाल्यास ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न उरतो. बाहेरील व्यक्तींना उमेदवारी देऊन थेट आमदार केल्यामुळे याआधीच भाजपमधील प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच निरंजन डावखरे यांना आयत्यावेळी पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देऊन आमदारपदी निवडूण आणले गेले. त्यामुळे भाजप आपली आयात नीती कायम ठेवतो का? हे पहावे लागेल.

- Advertisement -

निवृत्त होणाऱ्या आमदारांना विधानसभा, लोकसभा

निवृत्त होणाऱ्या चारही आमदारांना राष्ट्रवादीने आगामी विधानसभा व लोकसभेची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे सुनील तटकरे हे रायगड लोकसभा लढवतील. जयदेव गायकवाड यांनी २०१४ साली पुणे कन्टोनमेंट बोर्ड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, यावेळीही ते तिथून लढतील अशी शक्यता आहे. तर अमरसिंह पंडित यांचा गेवराई हा हक्काचा मतदारसंघ आहे. पण त्यांचा भाऊ विजयसिंह पंडित या जागेसाठी इच्छूक असल्याचे गेवराई येथील हल्लाबोल सभेत त्याने दाखवून दिले होते.

२७ जुलै रोजी निवृत्त होत असलेले सदस्य

काँग्रेस
माणिकराव ठाकरे
संजय दत्त
शरद रणपिसे

राष्ट्रवादी काँग्रेस
अॅड. जयदेव गायकवाड
नरेंद्र पाटील
अमरसिंह पंडित
सुनी तटकरे

भाजप
विजय (भाई) गिरकर
महादेव जानकर

शिवसेना
अनिल परब

शेकाप
जयंत पाटील

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -