घरताज्या घडामोडीराज्यात १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन

राज्यात १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन

Subscribe

आज रात्री ८ पासून १ मेपर्यंत संचारबंदी लागू

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती गंभीर झाली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बुधवार १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. १४४ कायदा लागू करत राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली असून अत्यावश्यक कारण नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयु बेडची कमतरता निर्माण झाली असून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय असल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले. फेसबूकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्र्यानी लोकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले.

- Advertisement -

अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व सेवा बंद राहणार असून. मात्र, सार्वजनिक वाहतूक जसे रेल्वे, बस या केवळ अत्यावश्यक सुविधेतील कर्मचार्‍यांसाठी लागू राहतील. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी ५४०० कोटी रुपयांचे लॉकडाऊन पॅकेज जाहीर केले. यामध्ये रिक्षावाले, फेरीवाल्यांपासून हातावर पोट असणार्‍या अनेक घटकांचा समावेश आहे. याशिवाय राज्यातील ७ कोटी नागरिकांना ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ महिनाभर मोफत दिले जाणार आहे. इतकेच नाही तर गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी मोफत दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. रोजी बंद झालीय पण रोटी बंद होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम नसेल तर बाहेर पडू देऊ नका.आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक सुरू राहील, ती केवळ जीवनावश्यक सेवा देणार्‍यांसाठीच असेल. औषधे, लस उत्पादक, अत्यावश्यक सेवा देणारे, मास्क वितरक, वैद्यकीय लोक, जनावरांशी संबंधित दवाखाने उघडी राहतील. पेट्रोल आणि डिझेल पंप सुरू राहणार असून, बांधकामे जिथे सुरू आहेत, तिथेच कर्मचार्‍यांची राहण्याची सुविधा करा. याशिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंटवर पूर्वीप्रमाणे निर्बंध राहणार असून होम डिलिव्हरी मात्र सुरू राहील. याचवेळी गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून रस्त्यावरील खाद्यपदार्थ स्टॉल सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहतील.

- Advertisement -

याशिवाय संजय गांधी निराधार, श्रावळ बाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती योजना अशा पेन्शन लाभार्थ्यांना १ हजार रुपये आगाऊ देणार आहोत. यामध्ये ३५ लाख लोकांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र राज्य इमारत कामगार कल्याण मंडळ असून त्यात १२ लाख लाभार्थी आहेत. त्यांना १५०० रुपये देणार असून नोंदणीकृत घरेलू कामगार यांना निधी मिळेल. शिवाय अधिकृत फेरीवाले यांना एका वेळेचे १५०० रुपये दिले जाणार असून रिक्षाचालकांना १५०० रुपये मिळणार आहेत. तसेच आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब २००० रुपये दिले जातील. यासाठी सरकारने ५४०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.

असे असतील निर्बंध

-अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद
-रेल्वेसह सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार
-पेट्रोल- डिझेल पंप सुरू ठेवण्याचा निर्णय
-हॉटेल- रेस्टॉरंट बंद ठेवले जाणार
-आवश्यक कामाशिवाय बाहेर पडता येणार नाही
-रस्त्यावर खाद्यपदार्थ मिळतील, पण पॅकिंगमध्ये
-गरिबांना महिनाभर ३ कि. गहू, २ कि. तांदूळ मोफत
-शिवभोजन थाळी एक महिनाभर मोफत
-फेरीवाले, रिक्षाचालकांना १५०० रुपये मानधन
कामगार, आदिवासी समाजाला मदत देणार
-५४०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर
-१२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -