Coronavirus :वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुण्यातील सात गावं पुन्हा लॉकडाऊन, उपमुख्यमंत्र्यांचा गावाचाही समावेश

maharashtra lockdown in seven villages after covid cases rises in baramati
Coronavirus :वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुण्यातील सात गावं पुन्हा लॉकडाऊन, उपमुख्यमंत्र्यांचा गावाचाही समावेश

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील सात गावांमध्ये पुन्हा ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावाचाही समावेश आहे. बारामतीत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणुची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी बारामती तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. त्यामुळे पुणे जिल्हा प्रशासनाने कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यातील सात गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊव जाहीर करण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान बारामतीत एका दिवसात सुमारे ५०० रुग्ण आढळले होते, परंतु त्यानंतर कोरोना रुग्णसंख्य़ेत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली. त्यामुळे बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील सात मोठ्या गावांत पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या गावांत आता ७ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे.

आतापर्यंत बारामतीतील रुग्णांची संख्या २५ हजार ४३१ वर पोहचली आहे. त्यापैकी २४ हजार ४७४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. बारामती शहर व तालुक्यात अद्याप साडे नऊशेहून अधिक सक्रिय रूग्ण आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना संक्रमणाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात नागरिकांच्या आत अँटीजेन टेस्टही केल्या जात आहेत. या टेस्टदरम्यान २७ लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता ग्रामस्थांनी एकत्र येऊन सात दिवस हे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.