घरCORONA UPDATECM on Maharashtra Lockdown : मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण लॉकडाऊनचा इशारा; दोन दिवसात निर्णय...

CM on Maharashtra Lockdown : मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण लॉकडाऊनचा इशारा; दोन दिवसात निर्णय घेणार – मुख्यमंत्री

Subscribe

येत्या एक दोन दिवसात नियमावली जाहीर करणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबत भाष्य केलं. लॉकडाऊनची शक्यता पूर्णपणे टळलेली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. मात्र, आज लॉकडाऊन करत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. येत्या दोन दिवसात मंत्री आणि तज्ज्ञांशी बोलून नियमावली जाहीर करणार अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

“आज मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाही आहे. पण दोन दिवसांत मला दृश्य स्वरूपात फरक दिसला नाही, आणि ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय दिसला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागेल,” असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मी अजून काही जणांशी बोलत आहे. मला वेगळा उपाय हवाय. लॉकडाऊन हा उपाय नाही. पण संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण झाल्यानंतर देखील काही प्रमाणात संसर्ग होऊ शकतो. पण या सगळ्यापेक्षा मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही नियम पाळा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र घाबरु नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं. मार्ग काढण्यासाठी तुमच्याशी संवाद साधतोय. परिस्थितीतून मार्ग काढता येईल याचा विचार करण्यासाठी संवाद साधतोय, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाने मायावी राक्षसासारखं देशाला व्यापून टाकलं आहे. मी म्हणालो होतो की परिस्थिती अशीच राहिली, तर आपल्याला लॉकडाऊन लागू करावं लागतोय की काय, अशी शक्यता होती. ती परिस्थिती आजही कायम आहे. मात्र, मधल्या काळात आपण शिथील झालो. लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाल्यानं प्रादुर्भाव वाढला, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळातही विरोधकांचा शिमगा केला, असा टोला देखील लगावला. यावर मी नंतर बोलणार आहे, असं देखील ते म्हणाले.

कोरोनाने नवा अवतार धारण केलाय. मार्चपासून कोरोना अक्राळविक्राळ स्वरुपात वाढतोय. एप्रिलच्या शेवटापर्यंत आपल्याला सयंम बाळगावा लागेल, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबतची माहिती दिली. सुरुवातीला कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या २ लॅब होत्या. आता कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या ५०० लॅब तयार करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये दिवसाला ५० हजार चाचण्या केल्या जात आहेत. महाराष्ट्रामध्ये दिवसाला १ लाख ८२ हजार चाचण्या केल्या जात आहेत. अडीच लाख चाचण्या करण्याचं लक्ष्य सरकारचं आहे. या चाचण्या RTPCR द्वारे करण्याचं लक्ष्य आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

- Advertisement -

आपण काहीही लपवलेलं नाही आणि लपवणार नाही. म्हणून आपण सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर ठेवतो. दुसरीकडे काय झालं, फक्त महाराष्ट्रात कसे वाढतात? यावर मला बोलायचं नाही. मला कुणी व्हिलन ठरवलं, तरी मी माझी जबाबदारी पार पाडेन”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांनाही टोला लगावला.

मार्च महिन्यातच कोव्हिडने महाराष्ट्रात शिरकाव केला. त्यानंतर राक्षसासारखा महाराष्ट्रावर हावी झाला. मधल्या काळात परिस्थिती नियंत्रणाल आली होती. आपण संयमी राहिल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या महिन्यात पार पडलं. लॉकडाऊन काळात जगाची आर्थिक परिस्थिती खराब झाली. तरीही अजित पवार यांनी संकटातही महाराष्ट्र पुढे नेणारा अर्थसंकल्प मांडला. महाराष्ट्रात राजकीय शिमग्याला सुरुवात झाली. पण मी त्याला आता उत्तर देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

रुग्णवाढ झपाट्याने होतेय

“लॉकडाऊनचा उपयोग संसर्ग थांबवण्यासाठी आणि आपली आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आहे. रुग्णवाढ ही सध्या झपाट्याने होत आहे. राज्यात १७ सप्टेंबर २०२० रोजी ३ लाख सक्रिय रुग्ण होते. १ एप्रिलला त्यात भर पडली आहे. तेव्हा ३१ हजार मृत्यू होते. आता ५४ हजार ९०० च्या आसपास रुग्ण झाले आहेत. तेव्हा एका दिवशी २४ हजार रुग्ण आढळले होते. १ एप्रिलला ४३ हजारहून जास्त रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली, तर १५ ते २० दिवसांत आपल्याकडच्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागतील. त्याही वाढवण्याचे आदेश दिले आहेत. पण बेड्स वाढवले, व्हेंटिलेटर्स वाढवले, आयसीयुचे बेड्स वाढवले, तरी डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार? हाच खरा चिंतेचा विषय आहे,” असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सुविधा अपुऱ्या पडतील 

“आज ४५ हजार नवे रुग्ण वाढण्याची शक्यता. आपण कोणत्या दिशेला चाललोय? याच वेगाने जर रुग्णवाढ होत राहिली तर विगलीकरणात सध्या २ लाख २० हजार बेड्स आहेत. त्यापैकी १ लाख ३७ हजार बेड्स भरले गेले आहेत. म्हणजे ६५ टक्के बेड्स भरले आहेत. आयसीयू बेड्स हे २०,५१९ आहेत. ते जवळपास ४८ टक्के भरले आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलिटर्स बेड्स २५ टक्के भरले आहेत. ही परिस्थिती अशीच राहीली तर सर्व सुविधा अपुऱ्या पडतील,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

“डॉक्टर, नर्स, कर्मचारी आपल्यासारखेच माणसं आहेत. ते आजारी पडले. त्यानंतर निगेटिव्ह झाल्यानंतर पुन्हा करोना रुग्णांच्या सेवेत येत आहेत. टेस्टिंग करण्यासाठी घराघरात जाऊन आपलेच बंधू-भगिनी अथकपणे काम करत आहेत. त्यांना आपण दिलासा देणार आहोत की नाही?” असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण

“आपण लसीकरण वाढवलं पाहिजे. कालच्या दिवसात महाराष्ट्रात ३ लाख नागरिकांना लसीकरण केलं आहे. देशात एकाच दिवशी होणाऱ्या लसीकरणाचा हा सर्वाधिक आकडा आहे. आत्तापर्यंत आपल्या ६५ लाख नागरिकांना लसीकरण केलं आहे. आपल्या क्षमतेनुसार लशींचा पुरवठा होत नाहीये. ती मागणी मान्यही होईल,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -