घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र लॉकडाऊन

महाराष्ट्र लॉकडाऊन

Subscribe

31मार्चपर्यंत मुंबई लोकल सेवा बंद,राज्यात जमावबंदीचे कलम 144 लागू

तिसर्‍या स्टेजच्या करोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील रेल्वे, खाजगी बसेस एसटी सेवा बंद राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबत माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

करोना विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या कमीत कमी किंबहुना थांबवायची आहे आणि म्हणून उद्या सकाळपासून मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण नागरी भागामध्ये 144 कलम नाईलाजाने लावत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

सोमवारपासून नागरी भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. भाजीपाला, दूध, औषधे, किराणा माल, इतर जीवनावश्यक वस्तुंची दुकाने चालू राहतील. तसेच वीज पुरवठा, बँका आणि त्यासंबंधी व्यवहार चालू राहतील. पण जिथे वर्क फ्रॉम होम शक्य तिथे करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सरकारी कर्मचारी संख्या २५ वरून ५ टक्क्यांवर आणली आहे. केवळ ५ टक्के सरकारी कर्मचारी राज्याचा भार सांभाळणार आहे. त्यांच्यावर जास्त भार देऊ नका. हे संकट टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्या. जीवनावश्यक कामांसाठीच बससेवा चालू राहील. मंदिरे, मशिदी चालू असतील तर ती तातडीने बंद करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
या संकटावर मात कशी करायची या चिंतेने सर्व जग ग्रासले आहे. आज नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू आहे. रात्री अनेक जणांना वाटेल की आता नऊ वाजून गेले आता घराबाहेर पडूया. मी आपल्याला थोडीशी आणखी काळजी घ्यायला सांगणार आहे. किंबहुना नाईलाज म्हणून संचारबंदी किंवा जनता कर्फ्यूचा निर्णय घ्यावा लागत आहे. हा संयम आपल्याला उद्या सकाळपर्यंत ठेवायचा आहे. कृपया नऊ वाजल्यानंतर घराबाहेर पडू नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

लॉकडाऊमध्ये काय होईल?
* औषधे, भाजीपाला, किराणा दुकाने सुरू राहतील. धान्याची आवक, बँका सुरू राहतील.
* महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.
* रेल्वे, खासगी बसेस, एसटी बसेस बंद पूर्णपणे बंद.
* जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरू राहील.
* शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.
* आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून मुंबई महाराष्ट्रात येणारी विमाने बंद.
* ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहे व ज्यांच्या हातावर शिक्केे आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.
* ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल.
* सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरू राहील; पण भाविकांसाठी प्रवेश बंद असेल.

लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या ठप्प

करोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी 22 मार्च रविवारी मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत मुंबई लोकलसेवेसह देशभरातील सर्व रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या 31 मार्चपर्यंत लोकल तसेच, भारतीय रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. करोना विषाणूचा वाढता धोका पाहता भारतीय रेल्वेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

येत्या 31 मार्चपर्यंत फक्त मालवाहतूक करणार्‍या गाड्या सुरू राहतील, इतर सर्व प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने दिला आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व लांब पल्ल्याच्या पॅसेंजर, मेल, एक्स्प्रेस गाड्या या 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. फक्त मालगाड्या सुरू राहणार आहे. तसेच, आज रात्री 12 पासून मुंबई लोकलही बंद ठेवल्या जाणार आहे. त्यामुळे अखेर मुंबईची लाईफलाईनही ठप्प पडणार आहे. ज्या ट्रेन किंवा एक्स्प्रेस या संध्याकाळी 4 पूर्वी निघाल्या असतील त्या ट्रेन सुरू राहणार आहेत. तर देशात इतर ठिकाणी गरजेच्या वस्तू ने-आण करण्यासाठी मालगाड्या मात्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच, ज्या प्रवाशांनी तिकिटांचे बुकिंग केले असेल त्यांना पूर्ण पैसे रिफंड करण्यात येतील.

एसटीची सेवा बंद ;अत्यावश्यक सेवेसाठी 500 बसेस धावणार

करोनाचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली. त्यामुळे रेल्वे, लोकलसेवा, एसटी, मोनो आणि मेट्रो बंद असणार आहे. सर्वसाधारण प्रवासासाठी एसटी सेवा बंद असली तरी राज्यभरात अत्यावश्यक सेवेसाठी ५०० एसटी बसेस् धावणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

देशासह महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सध्या राज्यात करोनाबाधीतांचा आकडा ७४ झाला आहे. करोनाचा फैलाव अधिक होऊ नये, यासाठी आता महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच भारतीय रेल्वेकडूनसुद्धा 31 मार्चपर्यंत सर्व रेल्वे गाड्या बंद करण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये मुंबईची जीवनवाहिनी उपनगरीय लोकल सेवासुद्धा बंद राहणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवे देणार्‍यांसाठी एसटी महामंडळातर्फे गाड्या चालविण्यात येणार आहे. कारण मुंबई अत्यावश्यक सेवा देणारे उपनगरात राहतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नयेत यासाठी एसटी महामंडळ मुंबईतून उपनगरता जाण्यासाठी काही बसेस चालविण्यात येणार आहे. राज्यभरात या अत्यावश्यक सेवा देणार्‍यासाठी 500 एसटी बसेस धावणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -