घरमहाराष्ट्रमास्क सक्ती मागे! 2 वर्षांनी कोरोना निर्बंधातून महाराष्ट्र मुक्त

मास्क सक्ती मागे! 2 वर्षांनी कोरोना निर्बंधातून महाराष्ट्र मुक्त

Subscribe

राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याने गुढीपाडव्यापासून राज्यातील जनतेला कोरोनाच्या सर्व प्रकारच्या निर्बंधातून मुक्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार नागरिकांना गुढीपाडव्यापासून मास्क घालण्याची सक्ती नसेल. मास्क घालणे ऐच्छिक असेल. त्याचप्रमाणे लोकल ट्रेनमधून प्रवास करताना कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन डोसची सक्तीही मागे घेण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनंतर महाराष्ट्रातील जनजीवन पूर्वपदावर येणार आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याने कोरोनाचे उर्वरित निर्बंध मागे घेण्याची मागणी होत होती. शिवाय गुढीपाडव्याची स्वागतयात्रा आणि रामनवमी निमित्त निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याचा निर्णय जाहीर करून सरकारने जनतेला गुढीपाडव्याच्या विशेष भेट दिली. या निर्णयाने राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली.

- Advertisement -

कार्यक्रमांवर बंधन नसेल
कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग नियंत्रण कायदा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गुढीपाडव्यापासून कोरोनाचे कोणतेही निर्बंध असणार नाहीत. लग्नविधीपासून सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, सिनेमागृह, हॉटेल, रेस्टोरंट येथे नागरिकांच्या उपस्थितीवर कोणतेही बंधन नसेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

दंड आकारणी नाही
गुढीपाडव्यापासून नागरिकांना मास्क घालण्याची कोणतीही सक्ती नसेल. त्यामुळे नागरिकांकडून दंड आकारला जाणार नाही. मास्क वापरणे पूर्णपणे ऐच्छिक असेल. कोरोनासाठी नेमण्यात आलेल्या टास्कफोर्सशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क अनिवार्य नसला तरीही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वतःसह इतरांची काळजी म्हणून मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

निर्बंध मागे
रेल्वे, बस प्रवासासाठी कोरोना प्रतिबंधित लसींच्या दोन मात्रांची सक्ती नाही.
लग्न, सांस्कृतिक कार्यक्रम, अंत्यविधी, राजकीय कार्यक्रम यावर उपस्थितीचे बंधन नाही.
सिनेमागृह, नाट्यगृह, हॉटेल, रेस्टोरंट, तरणतलाव पूर्ण क्षमतेने वापरता येणार.

नववर्षापासून नवीन संकल्प करुयात: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुने ते मागे सारून नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले.

यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढताना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले आणि संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल, ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार मानले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -