घरमहाराष्ट्रराज्यात पावसाची दमदार बॅटिंग; कोकणासह मुंबईत वादळी वाऱ्यासह संततधार

राज्यात पावसाची दमदार बॅटिंग; कोकणासह मुंबईत वादळी वाऱ्यासह संततधार

Subscribe

मुंबई, कोकणासह मराठवड्यातही वरुण राजाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवस मुंबई, कोकण मराठवाड्यात मुसळधार पाऊस कायम राहणार आहे

मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र अशा अनेक भागात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे. या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्या, नाले, तलाव भरून वाहत असल्याने कोकणासह नाशिक, कोल्हापूर भागात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान मुंबईतही सखल भागात पाणी साचले आहे. मराठवाड्यतही पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. राज्यात 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस हे कोकणासह, मध्य महाराष्ट्रासाठी पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे.

मुंबईत वादळी वाऱ्यांसह पाऊस

मुंबईसह आसपासच्या अनेक भागात काल रात्रीपासूनचं वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यात पुढील काही तासं अशीच स्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सेवेवर याचा परिणाम दिसत आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून केले जातेय. मुंबईतील अनेक सखल भागातील रस्त्यांवरही पाणी साचले आहे. त्यामुळे पाण्यातून वाट काढताना नागरिकांची दमछाक होत आहे.

- Advertisement -

मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहत असून त्यासोबत मध्यम आणि तीव्र स्वरुपाचा पाऊस पडत आहे. यात पुणे शहरातही पावसाचे जोर वाढला आहे. बहुतेक ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे.

पालघरमध्ये किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पालघरमध्येही पावसाची संततधार सुरु आहे. सततच्या पावसामुळे समुद्रात वादळ सदृश्यस्थिती निर्माण झाली असून तुफानी लाट उसळत आहेत. या परिस्थितीत मच्छिमारीसाठी बेटीने समुद्रात गेलेल्या मच्छिमार बांधवांच्या घरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पालघर प्रशासनाकडून समुद्र किनारी राहणाऱ्या या मच्छीमार बांधवांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र या इशाऱ्यानंतरही जिल्ह्यातील सुमारे दीड हजार बोटी आजही समुद्रात असल्याची माहिती आहे. पालघर, वसई, डहाणू, तलासरी तालुक्यांतील या बोटी आहेत. त्यामुळे पालघरमध्ये पावसाने धोका वाढवला आहे. अशी माहिती पालघरचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सह आयुक्त दिनेश पाटील यांनी दिली

- Advertisement -

कोल्हापूरातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ

दरम्यान कोल्हापूरमध्येही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पंचगंगा नदी पुन्हा धोकादायक पातळीपर्यंत पोहचत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट इतका आहे. सलग तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे पाणलोट क्षेत्र 87 टक्क्यांनी भरले आहे. त्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास हे धरण देखील लवकरंच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. तर दुधगंगा धरणारे 5 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 423 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

मराठवाड्यात तुफान पाऊस

मुंबई, कोकणासह मराठवड्यातही वरुण राजाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यात मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आधीच ओल्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात पावसाने चिंता वाढवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नांदेड, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडणार आहे. तर 10 ऑगस्टदरम्यान औरंगाबादमध्येही दमदार पावसाला सुरुवात होणार आहे.

बीड, अमरावतीतही थोड्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. यात नदी नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सोबतच लातूर जिल्ह्यात  पावसाने पुन्हा चांगलीच हजेरी लावली आहे.


Live Update : मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -