मुंबईत सकल हिंदू समाजाचा हिंदू जनआक्रोश मोर्चा; लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी

संग्रहित छायाचित्र

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी आज मुंबईत सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा सुरु आहे. दादरमधील छत्रपती शिवाजी पार्कमधून सुरु झालेला हा मोर्चा प्रभादेवीमधील कामगार मैदानाजवळ येऊन थांबणार आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी हे मोर्चेकरी रस्त्यावर उरले होते. या मोर्चात भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केशव उपाध्ये, खासदार गोपाळ शेट्टी, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह शेकडो भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते, यासह मोर्चात मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्या होत्या.

लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलं अशा काही पीडिताही या मोर्चात सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती समोर येत आहे. यावेळी मोर्चेकरींनी मोठ्याप्रमाणात नारीशक्तीच्या देखील घोषणा दिल्या. मोर्चात सहभागी नागरिकांची संख्या वाढत आहे. या मोर्चाचं नेतृत्व महिला करत आहेत. याठिकाणी एक सभा देखील होणार आहे. जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा, गर्व से कहो हिंदू है अशाप्रकारच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. हातात भगवे झेंडे, अंगात भगवे कपडे घालून हजारो लोक शिवाजी पार्कात एकवटले आहेत. मोर्चेकऱ्यांच्या हातात भूमी रक्षा, राष्ट्र सुरक्षा असं लिहिलेले फलक दिसत आहेत.

या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक चौकात पोलिसांचा हा ताफा तैनात होता.दरम्यान मुंबईत झालेल्या या मोर्चामुळे दादर परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र होतं.


जयदत्त क्षीरसागरांचा अखेर भाजप उमेदवाराला पाठिंबा; राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंसमोर मोठं आव्हान