मुंबई : राज्यात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उकाड्यातही वाढ होताना दिसत आहे. वाढत्या तापमानाचा फटका विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागाला बसताना दिसत आहे. यंदा मार्च महिन्यात उष्माघाताचा 33 जणांना फटका बसला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून काळजी घेण्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच याबाबतची माहिती राज्यातील विविध महापालिकांसह विविध यंत्रणांना पाठवली आहे. (Maharashtra News 33 in hospital due to heatstroke Cautionary note from the Department of Health)
हेही वाचा – Modi VS Raut : मोदींकडून आचारसंहितेचे उल्लंघन, तक्रार करणार; पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर राऊतांची टीका
आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सांगितले की, राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे होणारी जिवितहानी लक्षात घेऊन लोकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाशल्यचिकित्सकांच्या अखत्यारितील आरोग्य यंत्रणांनी व्यापक सर्वेक्षण करणे तसेच उष्णतेसंदर्भातील आजारांचे सर्वेक्षण करून नियमितपणे आपले अहवाल आरोग्य विभागाच्या पोर्टलवर संकलित करण्यास सांगण्यात आले आहे.
उष्माघाताचा फटका बसू नये यासाठी कृती आराखडा तयार
यामुळे ज्या भागात उष्णता विकारांचे प्रमाण वाढलेले आढळेल तेथे तत्काळ आरोग्य यंत्रणेला तसेच महापालिकांशी समन्वय साधून उपाययोजना केल्या जातील. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे डेथ ऑडिट जिल्हास्तरिय डेथ ऑडिट समितीकडून एका आठवड्यात करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. तसेच यंदा मार्च महिन्यात राज्यात 33 जणांना आतापर्यंत उष्माघाताचा फटका बसला आहे. त्यामुळे कोणत्या वर्गाला उष्माघाताचा फटका बसू शकतो याचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना व कृती आराखडा आरोग्य विभागाने तयार केल्याचे डॉ. नितीन अंबाडेकर म्हणाले. उन्हाचा फटका बसू नये यासाठी काय काळजी घ्यावी, तसेच कोणते कपडे परिधान करावे याविषयी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
हेही वाचा – Shirur Lok Sabha Constituency : अढळरावांच्या प्रचारात वळसेंची साथ नाही; दुखापतग्रस्त हाताचं कारण
उष्माघातामुळे मराठवाड्यात पहिला बळी
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान 39 अंश सेल्सियसवर पोहोचलं आहे. या वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात पहिला उष्माघाताचा बळी गेला आहे. गणेश कुलकर्णी (30) हा तरुण पैठण तालुक्यातील बिडकीन याठिकाणी एका खासगी कंपनीत कामाला होता. तो जैनपूर मार्गाने बिडकीनकडे जात असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो रस्त्यावर कोसळला. यावेळी त्याच्या तोंडातून फेस आला. त्यामुळे त्याला तातडीने बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. मात्रे यांनी गणेशला तपासून मृत घोषित केले. तसेच गणेशचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली.