महाराष्ट्रात आता अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. याद्वारे अवैध पद्धतीने येणाऱ्या अंमली पदार्थांवर आळा घालण्याचं काम केलं जाणार आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे प्रमुख हे विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे असणार आहेत. पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रण आणि देखरेखीखाली , विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. तसंच, अवैधरित्या होणाऱ्या अंमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरण यामध्ये गुंतलेल्या सर्वांवर प्रभावी फौजदारी कारवाई या अंतर्गत केली जाणार आहे. (Maharashtra News Establishment of Anti Narcotics Task Force in Maharashtra Action to be taken)
टास्क फोर्सअंतर्गत अशी केली जाणार कारवाई
- अवैध अंमली पदार्थ यांची विक्री, पुरवठा आणि वितरण यामध्ये गुंतलेल्या सर्वांवर प्रभावी फौजदारी कारवाई करणं हा मुख्य उद्देश आहे.
- अवैध अंमली पदार्थ सेवन करण्याची सवय लागलेल्या व्यक्तींचं पुनर्वसन करणं
- अवैध अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्परिणामाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.
- अवैध अंमली पदार्थांच्या वाहतूक आणि वितरण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं
महाराष्ट्राला अंमली पदार्थांनी विळखा घातल्याचंच चित्र आहे. अंमली पदार्थांचा विळखा शाळा- महाविद्यालंयापासून सार्वजनिक ठिकाणांपर्यंत जोरकसपणे बसत आहे. या व्यसनांचं केवळ शारिरिक नाही तर मानसिक पातळीवर होणारे परिणामही दीर्घकालीन, गंभीर आहेत. यालाच आळा घालण्यासाठी राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
अंमली पदार्थांचा विपरीत परिणाम
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अंमली पदार्थ हे एक रसायन आहे. शरीराच्या क्रिया मंदावण्यापासून त्या उत्तेजित करण्यापर्यंत अनेक बदल या उत्तेजक द्रव्यामुळे होतात. मज्जासंस्था आणि इतर अवयवांवर या अंमली पदार्थांचा परिणाम होतो. उत्तेजक अंमली पदार्थ, उदासीनता आणणारे पदार्थ, गुंगी आणणारे वेदनाशक पदार्थ, कॅनबीज, दृष्टी, श्रवणशक्ती, विचारप्रक्रियेस संभ्रम आणणारे पदार्थ हे सगळे शरीरावर विपरीत परिणाम करत असतात.
(हेही वाचा: संसदेचे विशेष अधिवेशन गणेशोत्सवातच का? ठाकरे गटाच्या खासदाराचा सवाल )