Homeमहाराष्ट्रMahayuti Politics : भाजप गटनेता आज निवडला जाणार; कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

Mahayuti Politics : भाजप गटनेता आज निवडला जाणार; कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

Subscribe

मुंबई – महाराष्ट्रमध्ये मुख्यमंत्री पदावरील सस्पेंन्स काही तासांत संपणार आहे. भारतीय जनता पक्षाचा गटनेता आणि महायुतीचा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठीची बैठक आज होणार आहे. त्यासाठी भाजपचे निरीक्षक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांचे मुंबईत आगमन झाले आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्रीपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहेत. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकार करण्यास तयार झाले आहेत. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर ते कामाला लागले आहेत.

एकनाथ शिंदे – फडणवीसांची झाली भेट

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. महायुतीत गृहमंत्री, नगरविकास खाते यावरुन सुरु असलेला संभ्रम या भेटीनंतर दूर झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे जेव्हापासून महायुती सरकार स्थापनेची चर्चा सुरु झाली आणि दिल्ली भेटीनंतरची या दोन्ही वरिष्ठ नेत्यांची ही पहिली भेट आहे.

गेल्या आठवड्यात दिल्लीत भाजपाचे शीर्षस्थ नेते अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर ते विश्रांतीसाठी सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या गावी गेले. तेथे दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ठाण्यात परतले. ठाण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी तसेच नवनिर्वाचित आमदारांनी शिंदे यांनी भेट घेतली होती. तसेच गिरीश महाजन यांनीही शिंदे यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.

उपमुख्यमंत्रीपदावर शिंदे राजी

एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसले असल्याची माहिती आहे. मात्र आता ते उपमुख्यमंत्रीपदावर राजी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद घेण्यात ते तयार नसल्याची माहिती होती. मात्र या भेटीत झालेल्या चर्चेनंतर शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुती सरकारचा शपथविधी उद्या (5 डिसेंबर) येथील आझाद मैदानावर होणार आहे. यावेळी तिन्ही पक्षांकडून किती मंत्री शपथ घेतात हे पाहाणे आता महत्त्वाचे राहणार आहे.

हेही वाचा : Maha Politics : महायुतीच्या शपथविधीला उद्धव ठाकरे आणि 19 राज्यांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

Edited by – Unmesh Khandale