Petrol-Diesel : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की नाही?; थोरातांनी स्पष्ट केली भूमिका

Revenue Minister Balasaheb Thorat

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात काही प्रमाणात कपात केल्यानंतर इतर राज्यांनी इंधनावरील करात कपात केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील व्हॅट आणि इतर करात कपातकरावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. यावर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोनामुळे उत्पन्न घटले असून पगार देण्यासाठीही कर्ज काढावं लागत असल्याचं सांगत त्यांनी राज्य सरकार कर कमी करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

इगतपुरी तालुक्यात काँग्रेसच्यावतीने शनिवारी इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. इंधन दरवाढीचा आम्ही विरोध केला असून केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात इंधनावरील करात वाढ केली आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीचे ५० हजार कोटी केंद्राने अद्यापही दिलेले नाहीत. कोरोनामुळे राज्याचं उत्पन्न घटलं असून पगार देण्यासाठीही कर्ज काढावं लागत असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन भाजप पेटवतंय

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन भाजप पेटवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपवर केला. राज्यात जेव्हा भाजपची सत्ता होती, तेव्हा त्यांनी एसटीचं विलिनीकरण केलं नाही. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घेणं शक्य नाही असं भाजपच्या तत्कालीन मंत्र्याने म्हटलं होतं. आता भाजप आंदोलन करत आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.