Homeमहाराष्ट्रMaharashtra Police : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचा राजीनामा? कायदा-सुव्यवस्था सदानंद दातेंच्या हाती

Maharashtra Police : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचा राजीनामा? कायदा-सुव्यवस्था सदानंद दातेंच्या हाती

Subscribe

रश्मी शुक्ला यांच्यावर काँग्रेस सातत्याने टीका करत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदावरून हटवून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.

(Maharashtra Police) मुंबई : राज्याच्या वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या रश्मी शुक्ला कथित फोन टॅपिंग प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. पण आता त्यांच्या राजीनाम्यानंतर त्या जागी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख (NIA) सदानंद दाते यांची नियुक्ती होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले. कडक शिस्तीचे समजले जाणाऱ्या सदानंद दाते यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळख असलेल्या रश्मी 2014 ते 2019 या काळात राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्या कालावधीत त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना खासदार संजय राऊत, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचा ठपका ठेवला होता. मात्र, 2022मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने त्यांना क्लीनचिट दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला.

हेही वाचा – Ajit Pawar : बीड पालकमंत्र्यांचा अजेंडा आला समोर; अधिकारी, कार्यकर्ते सुतासारखे होणार सरळ?

रश्मी शुक्ला यांच्यावर काँग्रेस सातत्याने टीका करत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदावरून हटवून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तर, संजयकुमार वर्मा यांची निवडणुकीच्या काळापुरती पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, 23 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. 25 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री उशिरा याबद्दलचे आदेश काढण्यात आले होते.

रश्मी शुक्ला 1988च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सशस्त्र सीमा दलाचे केंद्र प्रमुख आणि पुणे पोलीस आयुक्त म्हणून रश्मी शुक्ला यांनी काम पाहिले आहे. पण आता वैयक्तिक तसेच तब्येतीच्या कारणास्तव पोलीस महासंचालकपदाचा राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता त्यांच्या जागी एनआयएचे महासंचालक सदानंद दाते यांची नियुक्त करण्यात येणार असल्याचे समजते.

अत्यंत प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून दाते यांची ओळख आहे. एनआयएमधील नियुक्तीपूर्वी 1990च्या आयपीएस बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी असलेले सदानंद दाते हे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) डीजीपी होते. राज्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विरोधकांनी कायम आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच विरोधकांना शांत करण्यासाठी गृह विभागची जबाबदारी सांभाळणाऱ्या फडणवीस यांनी सदानंद दाते यांना पसंती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

देवेन भारतींचे काय?

मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांचेही नाव चर्चेत आहे. 1994च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील अधिकार्‍यांपैकी सर्वात जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सर्वात पॉवरफूल अधिकारी होते. त्यावेळी देवेन भारती हे मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (कायदा-सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते, परंतु ठाकरे सरकारमध्ये 3 सप्टेंबर 2020 रजोी देवेन भारती यांची एटीएसच्या प्रमुखपदावरून बदली करण्यात आली होती. पण मागील महायुती सरकारच्या काळात त्यांच्यासाठी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त हे खास पद नव्यानेच तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. परिणामी, कडक शिस्तीच्या सदानंद दाते यांच्याऐवजी देवेन भारती यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाची सूत्रे सोपविली जाण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – Supriya Sule : फरार कृष्णा आंधळे 51 दिवसांपासून आहे कुठे? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल