Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Political Crisis : मुख्यमंत्रिपद सोडले आणि शिंदेंनी भाजपाकडे मागितले थेट गृह...

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्रिपद सोडले आणि शिंदेंनी भाजपाकडे मागितले थेट गृह खाते, दिल्लीत काय घडले?

Subscribe

भाजपा आपल्याकडे साधारणपणे 25 मंत्रिपदे आपल्याकडे ठेवतील, असे अपेक्षित आहे. पण त्याचबरोबर मुख्यमंत्रिपद सोडल्याच्या बदल्यात गृह, नगर विकास या खात्यांसह आठ कॅबिनेट मंत्रिपदे, चार राज्यमंत्रिपदे शिवसेनेला देण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केल्याचे समजते..

(Maharashtra Political Crisis) मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा तडजोडीचे राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरील दावा शिवसेनेने मागे घेतल्याने सत्तास्थापनेतील मोठा अडसर दूर झाला आहे. पण असे असले तरी, काल, गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत झालेल्या बैठकीत काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाकडे थेट गृह आणि नगरविकास खात्यासह 12 मंत्रिपदे मागितली आहेत. याशिवाय, अन्य मागण्यासुद्धा भाजपाश्रेष्ठींकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Eknath Shinde’s demand to BJP to give home and urban development portfolio)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288पैकी 230 जागा जिंकल्या. त्यात भाजपाने इतिहासातील सर्वोच्च 132 जागांचा आकडा गाठला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापेक्षा दुपटीहून जास्त जागा मिळाल्याने भाजपाने यावेळी मुख्यमंत्रिपद स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होत नसल्याने भाजपा नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray group on unemployment : अल्पउत्पन्नवाल्यांना फुकट राशन देणार? ठाकरे गटाचा मोदींना सवाल

तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर पुन्हा विराजमान होण्यासाठी आग्रही होते. त्यांचे समर्थक आमदारांचेही तेच म्हणणे आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांनी याची कबुली दिली आहे. तथापि, बुधवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदाबाबत माघार घेत असल्याचे जाहीर केले आणि मुख्यमंत्रिपदाची कोंडी फुटली.

- Advertisement -

त्यानंतर राजकीय घडमोडींना वेग आला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अडीच वर्षांच्या कामगिरीबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी मुकाबला करण्याच्या रणनीतीची कल्पना दिली.

हेही वाचा – BJP : भाजपात बंडखोरांच्या घरवापसीला आता निष्ठावंतांचा विरोध; नेमकं प्रकरण काय?

भाजपा आपल्याकडे साधारणपणे 25 मंत्रिपदे आपल्याकडे ठेवतील, असे अपेक्षित आहे. पण त्याचबरोबर मुख्यमंत्रिपद सोडल्याच्या बदल्यात गृह, नगर विकास या खात्यांसह आठ कॅबिनेट मंत्रिपदे, चार राज्यमंत्रिपदे शिवसेनेला द्यावीत. तसेच, पालकमंत्रिपद निश्चित करताना शिवसेनेचा सन्मान राखण्यात यावा, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केल्याचे समजते. मागील कार्यकाळात मुख्यमंत्रिपदासह 10 खाती शिवसेनेकडे होती, हे उल्लेखनीय. याशिवाय, विधान परिषदेचे सभापतिपद द्यावे, अशी आग्रही मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विशेष म्हणजे, 2014 असो किंवा 2022 असो देवेंद्र फडणवीस यांनी कायमच गृह खात्या आपल्या अखत्यारितच ठेवले आहे. याशिवाय, नगरविकास खात्याची जबाबदारीही प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांकडेच ठेवली जाते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी एकप्रकारे भाजपाला पेचात टाकले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनेही अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्यासमवेत झालेल्या भेटीत आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदे मागितल्याचे सांगण्यात येते. विशेषत:, अर्थखात्याची जबाबदारी पुन्हा अजित पवार यांना हवी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामध्ये अजित पवार यांच्याव्यतिरिक्त छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, अनिल पाटील आणि धर्मराव बाबा अत्राम यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते.

हेही वाचा – Thackeray group on unemployment : अल्पउत्पन्नवाल्यांना फुकट राशन देणार? ठाकरे गटाचा मोदींना सवाल

केंद्रातही हवी हिस्सेदारी

भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याबद्दल एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान हवे आहे. शिवसेनेकडून प्रतापराव जाधव हे एकमेव मोदी मंत्रिमंडळात आहेत. राज्यमंत्री असलेल्या प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. तर, अजित पवार यांनाही स्वतंत्र राज्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु, त्यावेळी कॅबिनेट मंत्रीपदसाठी आग्रही राहात, अजित पवार यांनी थांबण्याची तयारी दर्शविली होती. आता मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनाही केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद हवे असल्याचे सांगण्यात येते.

आज मुंबईत बैठक

महायुतीच्या नेत्यांची आज, शुक्रवारी मुंबईत बैठक होणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मागण्यांबाबत त्यात चर्चा होईल, असे समजते. त्यानंतर दोन दिवसांत भाजपाचे निरीक्षक मुंबईत येतील आणि भाजपाच्या विधिमंडळ नेत्याची अर्थात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील, असे अपेक्षित आहे. (Maharashtra Political Crisis: Eknath Shinde’s demand to BJP to give home and urban development portfolio)

हेही वाचा – Sanjay Raut : विधानसभेचे निकाल मान्य नसले तरी…; मुख्यमंत्रि‍पदाबाबत काय म्हणाले राऊत?


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -