घरताज्या घडामोडीमोठा भाऊ शिंदे गटात, लहान भाऊ ठाकरे गटात; शिवसेनेतील बंडाळीमुळे कुटुंबात फूट

मोठा भाऊ शिंदे गटात, लहान भाऊ ठाकरे गटात; शिवसेनेतील बंडाळीमुळे कुटुंबात फूट

Subscribe

शिवसेनेत बंडखोरी झाल्याने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. तसंच, या बंडखोरीमुळे अनेकांच्या घरातही फूट पडली आहे. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या घरात ही फूट पडली असून मोठा भाऊ शिंदे गटात असून लहान भाऊ ठाकरेंच्या गटात आहेत. एकाच घरात राजकीय भूकंप झाल्याने याचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होत आहे.

प्रतापराव जाधव हे बुलडाण्याचे खासदार असून त्यांचे धाकटे भाऊ संजय जाधव संजय जाधव हे मेहकरचे माजी नगराध्यक्ष आणि गटनेते आहेत. या दोन सख्ख्या भावांमध्ये मतभिन्नता असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रतापराव जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून संजय जाधव यांनी ठाकरेंसोबतच राहणं पसंत केलं आहे. बाळासाहेब ठाकरे माझे दैवत असून उद्धवसाहेब माझे नेते असल्याचं संजय जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

दुसरीकडे, प्रतापराव जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांची बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी त्यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व पदांच्या नेमणुकीचे अधिकार देण्यात आले आहेत.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. त्यापाठोपाठ १२ खासदारांनीही शिंदे गटाला समर्थन दिले. यामध्ये प्रतापराव जाधव यांचाही समावेश होता. “आम्ही १५ ते २० लाख लोकांमधून निवडून येतो. त्यांना आम्ही बांधिल आहोत. संजय राऊतांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक होऊन दाखवावं”, अशी टीका प्रताप जाधव यांनी केली होती. राऊत यांनी कोणत्याही प्रभागातून निवडणूक लढवावी आणि नगरसेवक होऊन दाखवावं, असं आव्हान प्रतापराव जाधव यांनी दिलं होतं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -