घर महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का; पाच माजी नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का; पाच माजी नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश

Subscribe

काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका पुष्पा कोळी, गंगा माने, बब्बू खान, वाजीद कुरेशी व भास्कर शेट्टी या पाच माजी नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत. या पाच माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश आज ठाणे येथील एका कार्यक्रमात होणार असल्याचे सूत्रांकडून समजते

मुंबई: मुंबई महापालिकेची रखडलेली निवडणूक कधी होईल याबाबत आजही निश्चित सांगता येत नसले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून निवडणूक पूर्व तयारी जोरात सुरू आहे. शिंदे गटात सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका पुष्पा कोळी, गंगा माने, बब्बू खान, वाजीद कुरेशी व भास्कर शेट्टी या पाच माजी नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत. या पाच माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश आज ठाणे येथील एका कार्यक्रमात होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. (Maharashtra Politics Big blow to Congress Five former corporators will enter in Shinde group)

मुंबई महापालिकेची पाच वर्षांची मुदत दीड वर्षांपूर्वीच संपली आहे. त्यामुळे पालिकेत सध्या महापौर, उप महापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेते, विविध समिती अध्यक्ष या पदांवर कोणीही कार्यरत नाही. मात्र पालिकेचे कामकाज पालिका आयुक्त इकबाल चहल हे प्रशासक म्हणून सरकारी आदेशाने सांभाळत आहेत. मात्र, गतवर्षी मूळ शिवसेनेत असंतोष निर्माण होऊन राजकीय भूकंप झाला. शिंदे व ठाकरे गट अशी फाळणी झाल्याने मुंबईसह राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही ‘कमलाबाई’शी सूत जुळवून घेतल्याने राज्याचे दुसरे उप मुख्यमंत्री म्हणून तेही कार्यरत झाल्याने राज्यातील राजकारणाला आणखीन वेगळीची कलाटणी मिळाली.

- Advertisement -

मात्र दीड वर्षे होत आले तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला कोणत्याही भटाकडे, ब्राह्मणाकडे मुहूर्त मिळत नाही. तर दुसरीकडे निवडणुकीची वाट बघून बघून माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारही ताटकळले आहेत. निवडणूक होईपर्यंत मतदार संघ व मतदार यांचा मोर्चा कसा काय सांभाळायचा ? मतदारसंघात विकास कामे व इतर कामे कशी काय पार पाडायची ? जवळ होती नव्हती तेवढी आर्थिक रसद संपायला आली आहे तर काहींची रसद संपल्यात जमा आहे. त्यामुळे आता पर्याय काय ? याच्या शोधात पालिकेतील विविध पक्षांचे नेते, काही माजी नगरसेवक आहेत. पालिकेची निवडणूक येत्या ऑक्टोबरमध्ये होण्याची त्यांना आजही अपेक्षा आहे. मात्र ज्यांना निवडणुकीची व आपल्या राजकीय भविष्याची चिंता वाटत आहे व दुसरीकडे राज्याच्या सत्तेच्या चाव्या हाती असलेल्या शिंदे गटाचा भक्कम पर्याय वाटत आहे. शिंदे गट म्हणजे निवडणूक संधी आणि बरेच काही, असे ज्यांना वाटत आहे, ते आपला पक्ष सोडून शिंदे गटात उडी घेत आहेत.

आतापर्यंत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांच्या २३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. आता काँग्रेस पक्षात मुंबई अध्यक्ष पदाची धुरा नेते भाई जगताप यांच्याकडून वर्षा गायकवाड यांच्या हातात जाऊन काही दिवस उलटले असताना काल -परवापर्यंत काँग्रेसमधील ज्येष्ठ नगरसेवकासह अंदाजे १० – १२ माजी नगरसेवक होलसेलमध्ये शिंदे गटात जाण्याच्या तयारीत होते. मात्र कुठेतरी जरा माशी शिंकली आणि सात जणांनी तूर्तास थांबण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र आज पाच माजी नगरसेवक ठाणे येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये, पालिकेतील माजी नगरसेविका पुष्पा कोळी, गंगा माने, बब्बू खान, वाजीद कुरेशी व भास्कर शेट्टी यांनी नावे चर्चेत आहेत.

वर्षा गायकवाड यांना मोठा धक्का

- Advertisement -

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेऊन काही दिवस उलटले असताना त्यांच्या मतदारसंघातील व जवळच्या माजी नगरसेविका पुष्पा कोळी, माजी नगरसेवक बब्बू खान, गंगा माने व भास्कर शेट्टी ही मंडळी शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे वर्षा गायकवाड यांना हा सर्वात मोठा राजकीय धक्का बसणार आहे.

(हेही वाचा: बच्चू कडू यांच्या टीकेला शरद पवारांचे खोचक प्रत्युत्तर, म्हणाले – “कुणा गल्लीबोळातल्या लोकांबाबत…” )

- Advertisment -