मुंबई : पीकविमा घोटाळा, संतोष देशमुख हत्याकांड यामुळे बीड जिल्हा सध्या राज्यात चर्चेत आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुधवारी (ता. 05 फेब्रुवारी) बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला बीडच्या सर्व नेतेमंडळींना आमंत्रण देण्यात आले होते. परंतु, बीडमधील परळी मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री धनंजय मुंडे या कार्यक्रमाला गैरहजर असल्याचे पाहायला मिळाले. ते या कार्यक्रमाला येणार नसल्याचे आमदार सुरेश धस यांनी याआधीच सांगितले होते. परंतु, तरी सुद्धा राजकारणात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे मंत्री मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ते कार्यक्रमाला का गैरहजर आहेत, याचे कारण सांगितले आहे. (Maharashtra Politics CM Devendra Fadnavis in Beed, Minister Dhananjay Munde in Mumbai)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने आष्टीमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत यावेळी मंत्री पंकजा मुंडे सुद्धा आष्टीमध्ये पोहोचल्या. कार्यक्रमाच्या तासाभराआधी मंत्री धनंजय मुंडे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, “माझ्या डोळ्यावर आज मुंबई येथे पद्मश्री डॉ.टी.पी.लहाने सर यांच्या खासगी रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी पुढील चार ते पाच दिवस काळजी व विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कृपया मला भेटता येणार नाही. सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात सेवेत रुजू असेल,” असे मंत्री मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले. परंतु, तरी सुद्धा राजकीय वर्तुळात मुंडेंच्या गैरहजेरीबाबत चर्चा रंगल्या आहेत.
माझ्या डोळ्यावर आज मुंबई येथे पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने सर यांच्या खाजगी रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी पुढील चार ते पाच दिवस काळजी व विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कृपया मला भेटता येणार नाही. सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 5, 2025
गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे हे राजकीय वर्तुळातील चर्चेचा सर्वात मोठा विषय बनलेले आहेत. मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मीक कराड याचे नाव सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आल्यानंतर तर मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्याशिवाय, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल आहेत. तसेच, धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पण दमानिया यांच्या आरोपांवर धनजंय मुंडेंनीही पत्रका परिषद घेऊन आपली बाजू मांडली. तसेच, अंजली दमानिया यांनी आज दिवसभरात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खोटे व बेछूट आरोप केले आहेत. या विषयासह विविध विषयांवर मोघम आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांच्याविरोधात आपण आता फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा… Walmik Karad : वाल्मिक कराडला दिलासा देणारी बातमी; मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली