कणकवली: यंदा होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये स्थानिक डी.एड. बेरोजगारांना 2010 प्रमाणे पुन्हा डावलण्यात येईल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे सद्यस्थितीत होणारी भरती ही पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरीय भरती प्रक्रिया असणार आहे. मागच्या 10 वर्षांपासून ही भरती न झाल्यामुळे येत्या शिक्षक भरतीत जिल्ह्यातील उमेदवारांना संधी न मिळाल्यास त्यांची वयोमर्यादा संपणार आहे. त्यामुळे पोर्टलमधूनच पूर्वीचे कोकण निवड मंडळ स्थापन करून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक डी.एड बेरोजगारांना न्याय द्यावा, अशी मागणी डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्यावतीनं केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन केली आहे. (Maharashtra Politics D Ed jobless will get justice Narayan Rane s big statement regarding teacher recruitment)
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, भाजप दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, अजय परब, समीर ठाकूर आदी उपस्थित होते.
27 मार्चपासून 14 दिवसांचं उपोषण करणाऱ्या स्थानिक डी.एड. बेरोजगारांची भेट घेणार असल्याचं नारायण राणे म्हणाल्याचं सांगण्यात येत आहे. जूनपासून शाळा सुरू होऊन पाच महिने झाले, तरी काही शाळांना शिक्षक मिळालेले नाही. स्थानिकांना त्या शाळेत शिक्षक म्हणून संधी द्यावी, यासाठी प्रयत्न झाले. पण स्थानिकांवर प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केलं. त्यावर लक्ष वेधण्यासाठी व मागील पाठपुरावा करण्यासाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली.
जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगारांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.याबाबत येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, व सचिवांची मंत्रालय पातळीवर एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढू, असा शब्द नारायण राणे यांनी दिला आहे. असं सांगितलं जात आहे.
( हेही वाचा :संजय राऊतांचा तपास यंत्रणाना थेट इशारा; म्हणाले-आमचे सरकार येऊ द्या… )