मुंबई : महाराष्ट्र विधानभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळाला आहे. महायुतीने महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत केल्याने राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे महायुतीच्या या कार्यकाळात कोण मुख्यमंत्री होणार? आणि कोण उपमुख्यमंत्री होणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. पण त्याआधी महायुती सरकारचा कार्यकाळ आज मंगळवारी (ता. 26 नोव्हेंबर) संपुष्टात येत असल्याने सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला आहे. या तिघांच्याही राजीनाम्यानंतर आता 14 वी विधानसभा विसर्जीत झालेली आहे. (Maharashtra Politics Eknath Shinde resigns as Chief Minister, Devendra Fadnavis and Ajit Pawar as Deputy Chief Ministers)
राजभवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले. यावेळी या तिघांनीही आपापले राजीनामे राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंत्री दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी राजीनाम्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत या तिघांचे राजीनामे स्वीकारले. मात्र, नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्याच्या काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडेच सोपविण्यात आली आहे. परंतु, आता राज्यात महायुतीची सत्ता येणार हे माहीत असले तरी महायुतीतून मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकली जाणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
हेही वाचा… Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदी फडणवीसच! दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब
मुख्यमंत्रिपदी फडणवीसच!
महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरविण्यात आला नव्हता. ज्यामुळे निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा महायुतीकडून अद्यापही मुख्यमंत्रिपदासाठीचे नाव निश्चित करण्यात येत नसल्याचेच पाहायला मिळत आहे. पण दिल्लीतून मात्र मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. ज्यांच्या जास्त जागा त्यांना मुख्यमंत्रीपद या सूत्राप्रमाणे भाजपा स्वतःकडेच मुख्यमंत्रिपद ठेवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निवडणुकीत भाजपाने 132 जागांचा विक्रमी आकडा गाठला आहे. 2014मध्ये मोदी लाटेत भाजपाने 122 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019मध्ये भाजपाचे 105 जण निवडून आले हेते, पण यावेळी भाजपाने 132 जागा जिंकत मोदी लाटेचा रेकॉर्डही मोडला आहे.