मुंबई : महाराष्ट्रात सुमारे पावणेदोन वर्षांत दोन मोठे पक्ष फुटले. या नाट्यमय घडामोडीत काही आमदार-खासदारांनी फुटीर गटाला साथ दिली. तर, चार असे नेते होते की, सुरुवातीला फुटीर गटाबरोबर गेले आणि त्यानंतर ते माघारी फिरले. आपण आता संघटनाप्रमुखांबरोबरच आहोत, असे छातीठोकपणे या चौघांनी सांगितले. यात एक खासदार आणि तीन आमदार आहेत.
हेही वाचा – NCP : बारामतीत सुप्रिया सुळे अडीच लाख मताधिक्क्याने निवडून येतील; रोहित पवारांचा दावा
जून 2022मध्ये शिवसेनेत फूट पडली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांचा हा दावा मान्यही केला. त्यानंतर वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटली आणि शिवसेनेचीच पुनरावृत्ती झाली. विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह गेले. मात्र, दोन्ही नेत्यांबरोबर गेलेले दोन-दोन गडी आपापल्या गडावर परत आले.
पारनेरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश लंके यांनी शुक्रवारी अहमदनगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात आमदारकीचा राजीनामा दिला. त्याचवेळी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (एनसीपी – एसपी) प्रवेश करत असल्याचेही जाहीर केले आहे. अजित पवार यांना हा दुसरा मोठा धक्का आहे.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
गेल्यावर्षी 2 जुलै रोजी अजित पवार यांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हेसुद्धा अजित पवार यांच्यासोबत होते. पण नंतर त्यांनी, ‘बाप नाही विसरायचा…’, असे सांगत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर, अजित पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडेही शपथपत्र दिले होते. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीच्यावेळी ही बाब समोर आली होती. पण ते अद्यापही आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे सांगतात. त्यामुळे अजित पवार यांची साथ सोडून खासदार अमोल कोल्हे आणि माजी आमदार निलेश लंके हे दोघे शरद पवार यांच्याकडे परत आले आहेत.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : परभणीतून रासपच्या महादेव जानकरांना उमेदवारी; सुनील तटकरेंची घोषणा
ठाकरेंनाही दोन आमदारांची पुन्हा साथ
एकनाथ शिंदे यांनी 20 जून 2022 रोजी बंडाचा झेंडा फडकावत काही आमदारांसह गुजरातमधील सुरत गाठले होते. त्यांच्यासोबत अकोल्याच्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख होते. पण नंतर ते माघारी फिरले आणि आपली निष्ठा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाशीच असल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनी एक पत्रावर आपल्याबरोबर आलेल्या सर्व आमदारांची सही घेतली होती. त्यात नितीन देशमुख यांचाही समावेश होता. मात्र, ती सही माझी नसल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला होता.
त्यांच्याप्रमाणेच, उस्मानाबाद कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला निघाले होते. पण नंतर आपण अर्ध्या वाटेवरूनच ते माघारी फिरले. आपली दिशाभूल होत असल्याचे जाणवल्याने गुजरातच्या सीमेवर पोहचल्यानंतर अंधारात वाहनांच्या गर्दीतून आपण शिंदेंच्या हातावर तुरी देऊन गाडीतून सुटका करून घेतल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत साथ देण्याऐवजी नितीन देशमुख आणि कैलास घाडगे पाटील हे उद्धव ठाकरे यांच्याकडे परतले.
हेही वाचा – Thackeray Group : ठाकरे गटाचे शिलेदार करणार लोकसभेचा प्रचार, यादीत 40 जणांचा समावेश