मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेला नांदेड भाजपाच्या गळ्याला लागला अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशातच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे की, नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. कुठल्या व्यक्तीचा नाही. (Maharashtra Politics Nanded is the stronghold of Congress Criticism of Nana Patole)
हेही वाचा – Maharashtra Politics : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला ‘या’ व्यक्तीवरही शाश्वती नाही
अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींवर पत्रकार परिषद घेत भाष्य केले. याचवेळी नाना पटोले यांनी प्रश्न विचारण्यात आला की, अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे आणखी आमदार पक्ष सोडणार आहेत का? या प्रश्नावर ते म्हणाले की, 15 तारखेला सीएलपीची बैठक होणार आहे. आम्ही त्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता सगळे आमदार सोबत राहाणार आहोत. 16 आणि 17 तारखेला लोणावळा येथे आमचं शिबीर होणार आहे. या शिबीरात देखील आमचे सगळे आमदार उपस्थित राहतील, त्यामुळे अशा सर्व अफवांना पुर्णविराम दिला जावा, असे आमचे म्हणणे आहे, असे नाना पटोले म्हणाले.
संजय राऊत म्हणतात की, नांदेडची जागा निश्चित करण्यासाठी अशोक चव्हाण यांना भाजपात घेतले गेले आहे. त्यामुळे नांदेड कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, नांदेड हा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे, कुठल्या व्यक्तीचा नाही. त्यामुळे आता काँग्रेसचा त्याठिकाणी खासदार निवडून येईल. आमच्याकडे नांदेडमधील काँग्रेसचे सर्व लोकं आलेले आहेत. त्यांनी आमच्याकडून हमी घेतली आहे की, तुम्ही आम्हाला उमेदवार द्या. आमच्याकडे उमेदवार आहेत. आताच आमच्या प्रभारींनी सांगितले की, अनेक भाजपाचे आणि इतर पक्षाचे आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आता आम्हाला यावर चर्चा करायची नाही आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Jalgaon : पैशांच्या देवाणघेवाणीतून आधी राडा नंतर तुफान दगडफेक; परिसराला छावणीचं स्वरुप
संजय राऊत काय म्हणाले?
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नांदेड लोकसभा निवडणुकीच्या जागेवर भाष्य केले. ते म्हणाले की, अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये सतत लोकसभेच्या दोन निवडणुका हरले आहेत. त्यांच्या पत्नीही हरल्या आहेत. त्यामुळे नांदेड हा कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. नांदेडमध्ये काँग्रेसचाच उमेदवार लढेल आणि जिंकेल. वंचितने दावा सांगितला तर त्यावर आम्ही विचार करू. बाळासाहेब आंबेडकरांबरोबर निरंतन चर्चा सुरू आहे. तसेच जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येण्याचा क्षण समीप आला आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.