मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमी मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसतात. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरूनही उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधताना म्हटले होते की, शेतकरी आणि सरकारमधील संघर्षावर तोडगा काढण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. अशातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी दावा केला आहे की, विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. रवी राणांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे प्रतिक्रिया दिला आहे. (Maharashtra Politics On Ravi Ranas claim Chandrakant Khaire says Uddhav Thackeray is a singular leader)
हेही वाचा – NCP Crisis : शरद पवार गटाच्या नवीन नावाला अजितदादांचा विरोध, मात्र न्यायालयाकडून दिलासा
रवी राणांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, आमदार रवी राणा यांना कुठून स्वप्न पडलं? उद्धव ठाकरे हे एकवचनी नेते आहेत. आधीच तुम्ही लोकं उद्धव ठाकरेंना त्रास देत आहात. उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणे कदापि शक्य नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली. यावेळी त्यांना नितेश राणेंच्या टीकेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आमदार नितेश राणे यांचे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा ते चालत होते. ज्यांनी मोठं केलं त्यांनाच बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. या पोट्ट्याला काहीही कळत नाही. त्याच्या बापाला मोठं कोणी केलं? उद्धव ठाकरे संयमी आहेत म्हणून आम्ही शांत आहोत. अन्यथा जशास तसे उत्तर दिलं असतं, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला.
जयंत पाटील भाजपमध्ये जाणार नाहीत
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हेसुद्धा भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, यासंबंधी चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या अनेक वेळा वावड्या उठल्या. पण मुद्दाम वावड्या उठविण्याचे काम भाजपा करते आहे. जयंत पाटील हे शरद पवारांना पुतण्यापेक्षा जवळचे आहेत. पुतण्याने धोका दिला, मात्र जयंत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला आहे. ते भाजपमध्ये जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली.
हेही वाचा – Arvind Kejriwal : …तर मी भाजपाला मतदान करण्यास सांगेन; विधानसभेत केजरीवाल असं का म्हणाले?
भाजपकडून संपूर्ण देशात दबाव तंत्राचा वापर
भाजपाकडून संपूर्ण देशात दबाव तंत्राचा वापर सुरू आहे. कामगार, उद्योगपती आणि शेतकरी भाजपाला त्रस्त झाले असून याचा फटका त्यांना येणाऱ्या निवडणुकीत बसणार आहे. लोकांनी साथ दिली तरच मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. पण लोकं त्रस्त आहेत. त्यामुळे ते भाजपाला मतदान करणार नाहीत, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.