(Maharashtra Politics) मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. तथापि, पाच दिवस झाले तरी, मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. या पदासाठी भाजपा आग्रही असून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनीही या पदावर दावा केला आहे. यातूनच एकनाथ शिंदे एक नवा पवित्रा घेण्याच्या तयारीत असून ते नव्या सरकारला बाहेरून पाठिंबा जाहीर करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले. (Possibility of Eknath Shinde supporting the new government from outside)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288पैकी 230 जागा जिंकल्या. त्यात भाजपाने इतिहासातील सर्वोच्च 132 जागांचा आकडा गाठला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापेक्षा दुपटीहून जास्त जागा मिळाल्याने भाजपने यावेळी मुख्यमंत्रिपद स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा होत नसल्याने भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. असे असताना, शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर पुन्हा विराजमान होण्यासाठी आग्रही आहेत. त्यांचे समर्थक आमदारांचेही तेच म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी बिहारचा दाखला दिला आहे. जनता दल युनायटेडचे कमी आमदार असतानाही त्या पक्षाचे प्रमुख नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिल्याचा युक्तिवाद शिंदे समर्थकांचा आहे. मात्र, भाजपाने हा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. पण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना निवडणुकीपूर्वी तसा शब्द देण्यात आला नव्हता, असे भाजपाने स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा – Sanjay Raut : भाजपाला मिळालेले यश देशासाठी, राज्यासाठी घातक; राऊतांचा हल्लाबोल
त्याचबरोबर, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणूक लढविली आहे. आता एवढे यश मिळाल्यानंतर त्यांना लगेच या पदावरून बाजूला करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे त्यांना किमान एक वर्ष मुख्यमंत्रिपद द्यावे, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. मात्र दुसरीकडे, महाराष्ट्रातील भाजपा नेते आणि आमदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह, त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चर्चेअंती दिलेला हिरवा कंदील या जोरावर दिल्लीतील भाजपाश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.
मुख्यमंत्रिपदासाठी अडून राहिलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपाश्रेष्ठींनी दोन पर्याय ठेवले आहेत. राज्यात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करा अथवा केंद्रात मंत्रीपद घ्या, असे सुचविले आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी भाजपाश्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांना काल 72 तासांची मुदत दिल्याचे समजते. त्याउलट, आपले चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्री करा आणि मला महायुतीचा समन्वयक नेमा, अशी अट एकनाथ शिंदे यांनी भाजपाश्रेष्ठींना घातल्याचे सूत्रांनी सांगितले.
आता या तिढ्यावर एकनाथ शिंदे यांनी मार्ग काढला आहे. महायुतीला धक्का न लावता, सरकारमध्ये सहभागी व्हायचे नाही, अशी भूमिका ते घेणार असल्याचे सांगण्यात येते. भाजपाच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारला बाहेरून पाठिंबा शिवसेना देईल आणि याबाबतची घोषणा एकनाथ शिंदे आज, बुधवारी दुपारी 3 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत करण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics : Possibility of Eknath Shinde supporting the new government from outside)