मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईचा सौदा करत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज (ता. 22 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी बोलताना राऊतांनी महानंद डेअरीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकार एक डेअरी चालवू शकत नाही, असे म्हणत राऊतांनी सरकारला सुनावले आहे. (Maharashtra Politics : Sanjay Raut serious allegations against the Mahayuti government)
हेही वाचा… Sanjay Raut : जे. पी. नड्डा यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन, राऊत म्हणतात – “ढोंग बंद करा”
महानंद डेअरीचा कारभार आता गुजरातमधून चालवला जाणार आहे, या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, महानंदचे चेअरमन हे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेव्हणे होते. हे राज्य सरकार एक डेअरी चालवू शकत नाहीत. पण स्वतःच्या डेअरी बरोबर सुरू आहेत. शुगर लॉबीच्या सर्व लोकांच्या डेअरी व्यवस्थित सुरू आहेत. यांना महानंद डेअरीच्या कारभाराशी काही घेणेदेणे नाही, परंतु महानंद डेअरीची गोरेगाव येथील मोक्याच्या जागेवर यांची नजर आहे. या डेअरीची 50 एकरची प्राईम जागा विकण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. ही जमीन अदानीला देण्याचा डाव असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
त्याशिवाय, एकेक करून सर्व गुजरातला घेऊन जाण्याचा घाट घातला जात आहे. इतकेच नाही तर धारावीचा आणि मुंबईचा सौदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुंबईचा सौदा करायला निघाले आहेत. महाराष्ट्रातील असूनही हे लोक राज्यातील संस्था गुजरातमध्ये जाण्याला विरोध करत नाहीत, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे. ज्यामुळे त्यांच्या या आरोपाला महायुतीतील नेते काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. कोणाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. 21 फेब्रुवारी) केले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाच्या बापाचा पत्ता आहे का? भाजपाला आता 10 बाप झाले आहेत. त्यांना खोकेवाले बाप घेऊन राजकारण करावे लागते. एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट हे भाजपाचे बाप आहेत. शिवसेनेचा एकच बाप आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे आम्ही निर्भयपणे लोकांसमोर जातो. आमच्या नेत्यांची भाषणे सुरू असताना लोकं मध्येच उठून बिर्याणी खायला जात नाहीत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.