(Maharashtra Politics ) मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा दिली. या घोषणेमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. त्यामुळे निवडणुकीचा विचार वेगळ्या वळणावर गेला, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेही हे मत मांडावे, हे आश्चर्यकारक असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. (Thackeray group targets Sharad Pawar regarding polarization of votes)
राज्यात महाविकास आघाडीचा पराभव झाला. त्या पराभवाची कारणमीमांसा आपापल्या पद्धतीने सुरू आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करून भाजपा आणि त्यांच्या लोकांनी निवडणुकांवर प्रभाव पाडला. त्यामुळे जे व्हायचे ते झाले. त्यावर आता डोके फोडून काय उपयोग? असा उद्विग्न सवाल सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : 11 जिल्ह्यात मविआचा सुपडा साफ, तर 20 ठिकाणी काँग्रेस हद्दपार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी 288 मतदारसंघांत 90 हजार बैठका घेतल्या आणि हिंदूंच्या मनात भय तसेच असुरक्षितता निर्माण करण्याचा कार्यक्रम पार पाडला. जेथे शंभर टक्के हिंदू मतदार आहेत, तेथील हिंदूंना भय वाटण्याचे कारण नव्हते. पण भय हा असा प्रकार आहे, जो साथीच्या रोगाप्रमाणे पसरत जातो. महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा चालला. मग योगी आदित्यनाथ यांचा हाच ‘कटेंगे’चा नारा झारखंडसारख्या आदिवासी राज्यात का चालला नाही? झारखंडला आदिवासी आहेत आणि अनेक भागांत ते जंगलात राहतात. या कमी शिकलेल्या लोकांवर ‘बटेंगे कटेंगे’ची मात्रा लागू पडली नाही, अशी टिप्पणी ठाकरे गटाने केली आहे.
हेमंत सोरेन यांच्यावर मोदी सरकारने जो अन्याय केला, त्याविरोधात झारखंडची जनता एकवटली आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या योगी आदित्यनाथ यांचा पराभव केला, पण महाराष्ट्रातील सुशिक्षित जनतेला ‘भय’ वाटले. हे भय नक्की कोणापासून होते? असा प्रश्न ठाकरे गटाने केला आहे.
योगी यांनी हिंदूंना सांगितले, एकत्र येऊन भाजपाला मतदान करा, नाहीतर तुमच्या कत्तली होतील, हे भय योगी यांच्यासारख्या नेत्याने निर्माण केले आणि त्यावर ‘एक है तो सेफ है’सारखे शिखर मोदी यांनी चढवले. महाराष्ट्रातील मतदारांना अशाप्रकारे भयभीत करण्याचा प्रकार घडला. झारखंडमध्येही हाच प्रयोग झाला. तेथे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस पक्षाची युती होती. ही युती विजयी झाली. महाराष्ट्राच्या जनतेला ‘बटेंगे’चे असे कोणते भय वाटले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांवर 90 हजार बैठका घेण्याची वेळ का आली? हा संशोधनाचा विषय आहे, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे. (Maharashtra Politics : Thackeray group targets Sharad Pawar regarding polarization of votes)
हेही वाचा – Shankaracharya : आधी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा आशीर्वाद; आता म्हणतात भाजपाचा विजय हा दैवी संकेत