मुंबई : सोयाबीन खरेदीसाठी राज्यातील तब्बल 07 लाख 64 हजार 731 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 03 लाख 69 हजार 114 शेतकऱ्यांनी तब्बल 07 लाख 81 हडार 447 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीच्या बाबतीत मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यांना मागे टाकले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी सोयाबीन खरेदीमध्ये प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. सोयाबीन खरेदीचा वेग पाहता यासाठीची मुदत वाढवण्याची गरज भासल्यास केंद्र सरकारकडे मुदत वाढवून मागीतली जाईल, असे मंत्री रावल यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Maharashtra ranks No. 1 in soybean procurement Compared to other states)
हेही वाचा… SS UBT On President : राष्ट्रपती भवन हा रबरी शिक्काच, ठाकरे गटाची सडकून टीका
प्रसार माध्यमांना सोयाबीन खरेदीबाबत माहिती देताना पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, अनेक जिल्ह्यांनी आपले खरेदी उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला अडचण येऊ नये यासाठी वेगाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया करण्याची तसेच दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पोहोचेल या संदर्भात वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. 31 जानेवारी 2025 पर्यंत खरेदी चालू राहणार असल्याने सोयाबीन खरेदीच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसेल. तथापि, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची गरज भासल्यास केंद्र सरकारकडे मुदत वाढवून मागीतली जाईल. राज्यात नाफेड व एनसीसीएफ अंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल एजन्सीच्या माध्यमातून ही सोयाबीन खरेदी सुरू आहे.
तसेच, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 01 ऑक्टोबर 2024 पासून यासाठी नोंदणी सुरू केली होती. त्यानुसार 15 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील 562 खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सूरू करण्यात आली आहे. नोंदणी करता येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीची मुदत एक वेळा वाढवली. त्यानंतर सुरुवातीला सोयाबीन खरेदीची मुदत 12 जानेवारी 2025 पर्यंत होती. मात्र या मुदतीत अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी न झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांना विनंती करून खरेदीची मुदत दि. 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे, अशी माहिती मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. तर, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात खरेदीच्या तुलनेत महाराष्ट्राने आतापर्यंत सर्वाधिक खरेदी केली आहे. या सहा राज्यांची एकूण खरेदी 18 लाख 68 हजार 914 मेट्रिक टन इतकी झाली असून एकट्या महाराष्ट्राने 07 लाख 81 हजार 447 मेट्रिक टन खरेदी केली असल्याचेही मंत्री रावल यांच्याकडून सांगण्यात आले.
राज्यात नांदेड जिल्ह्यात 57 हजार 528 शेतकऱ्यांकडून 1 लाख 290 मेट्रिक टन इतकी सर्वाधिक सोयाबीन खरेदी झाली आहे. त्यानंतर, हिंगोली जिल्ह्यात 29 हजार 764 शेतकऱ्यांकडून 60 हजार 989 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झाली. सुरुवातीच्या काळात आलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून आजही वेगाने खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. केंद्र सरकारने सन 2024-25 करीता सोयाबीनसाठी प्रति क्विंटल 4 चार 892 रुपये इतका हमीभाव घोषित केला असून त्यानुसार खरेदी सुरू आहे. हे दर मागील वर्षाच्या हमीभावापेक्षा 292 रुपये प्रति क्विंटल इतके जास्त आहे. सन 2024-25 मध्ये लागवडीखालील क्षेत्र 50.51 लाख हेक्टर असून उत्पादन 73.27 लाख मेट्रिक टन अपेक्षित आहे. पीएसएस खरेदीसाठी केंद्र सरकारने 14 लाख 13 हजार 270 मे.टन (19.28 टक्के) मंजूरी दिली असल्याची माहितीही मंत्री रावल यांनी दिली आहे.