मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली, त्याचे निकालही समोर आले. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले असून मविआचे पुरते धोबीपछाड झाले आहे. आता महायुतीच्या या विजयावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या विजयाचा फॉर्म्युलाच त्यांनी सांगितला आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या काही दिवस आधीच त्यांनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे म्हटले होते. (maharashtra results shankaracharya avimukteshwarananda says divine power working on victory of mahayuti)
शंकराचार्य म्हणतात, महायुतीला दैवी शक्तीने जिंकवले आहे. या निवडणुकीत, महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. यातील 132 जागा भाजपाकडे, शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. शंकराचार्यांचे म्हणणे आहे की, महायुतीला दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळेल, असा आपल्याला अंदाज होता. या दैवी शक्तींमुळेच महायुतीचा विजय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – Maharashtra Politics : सभागृहात थोरातांची कमी सर्वांना जाणवेल; पराभवावर सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया
अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, निवडणुकीच्या आधी सगळेच राजकीय विश्लेषक, कुडमुडे ज्योतिषी महायुती सरकारची परिस्थिती खराब होईल, असे सांगत होते. लोकसभा निवडणुकीत त्यांचा हा अंदाज खरा ठरला. त्यामुळे विधानसभेला देखील असंच काहीसं घडेल, असे अंदाज बांधले जाऊ लागले.
महायुतीला जे यश मिळाले आहे, तसे यश आजपर्यंत कोणालाही मिळालेले नाही. मग, हे कोणाला कळले कसे नाही, असा प्रश्न तुम्हाला पडेल, यामागचे कारण म्हणजे येथे दैवी शक्ती काम करत होत्या. दैवी शक्ती जेव्हा काम करत असतात, तेव्हा सामान्य माणसाला त्याचे कधीही आकलन होत नाही.
मात्र, आम्हाला याचा अंदाज होता. त्यामुळेच इतिहासात पहिल्यांदाच तुम्ही कोणत्याही शंकराचार्याला कोणत्याही पक्षासाठी मते मागताना पाहिले असेल. आम्हाला आमच्या मर्यादा माहीत नाहीत का, तरीही आम्ही हे का केले, कारण आम्ही त्या दैवी शक्ती अनुभवत होतो, ज्याचा आशीर्वाद एकनाथ शिंदे यांना मिळाला.
हेही वाचा – Shivsena UBT : संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना उबाठा आग्रही; पण नियम काय?
एकनाथ शिंदे यांनी प्रवाहाच्या विरूद्ध जात असे काम केले, जे आजपर्यंत कोणीही केले नाही. गायीला राज्य मातेचा दर्जा दिला. तेव्हाच आम्हाला असे वाटले होते की, गायीचा आशीर्वाद त्यांनी मिळणार. जसजशी निवडणूक जवळ येत गेली, आम्हाला हे मोठ्या प्रमाणात जाणवू लागले, की एकनाथ शिंदेंना गोमातेचा आशीर्वाद मिळणार आहे.
महाराष्ट्रातील शिवसेनेच्या कामगिरीबाबत स्वामी अविमुक्तेशरानंद सरस्वती म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेला अजूनही शिवसेनेबद्दल प्रेम आहे. म्हणूनच त्यांना 57 जागा दिल्या आहेत. याचाच अर्थ बाळासाहेबांचे विचार जे हिंदुत्ववादी विचार होते ते आजही जिवंत आहेत. मात्र, त्याचे नेतृत्व त्यांचे सुपूत्र नाही तर शिष्य करत आहेत, असेही ते शेवटी म्हणाले. (maharashtra results shankaracharya avimukteshwarananda says divine power working on victory of mahayuti)
Edited by : Ashwini A. Bhatavdekar