तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना महाराष्ट्र स्टार्टअपमधून चालना

उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Maharashtra startup is Promoting innovative concepts of youth
उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले

डिजीटल क्रांतीच्या २१ व्या शतकात जगात भारत अग्रस्थानी असेल तर त्यात महाराष्ट्राचे विशेष योगदान राहील. त्यासाठी देशातील तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य सरकार स्टार्टअप्सना प्रोत्साहन देईल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. कॅन्सर स्क्रीनिंग, प्लॅस्टिकपासून दीर्घकालीन टिकणारे रस्ते, फिशपॉन्डचे आधुनिकरण, एयर फिल्टरमार्फत इंधन बचत, पोल्ट्री व्यवस्थापन अशा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना यावेळी सादर केल्या. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत आयोजित महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये देशातील तरुणांनी नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या. सप्ताहासाठी देशातून १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी नोंदणी केली होती, त्यातील निवडक १०० स्टार्टअप्सनी सोमवारपासून ऑनलाईन सप्ताहात मंत्री, गुंतवणूकदार, तज्ज्ञ, उद्योजक, शासकीय अधिकारी यांच्यासमोर सादरीकरण केले.

त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना शुक्रवारी गौरविण्यात आले. प्रशासनात नाविन्यता आणणारे व अभिनव बदल घडवू शकणारे कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्यसुविधा, शाश्वतता (स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन), प्रशासन आणि इतर क्षेत्रातील स्टार्टअपचे सादरीकरण करण्यात आले.

या स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाखांचे विविध शासकीय कामांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. विविध खरेदी, शासनास हव्या असलेल्या विविध सेवा यामध्ये तरुणांच्या नवसंकल्पनांवर आधारीत स्टार्टअप्सना संधी देण्यात येईल. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.

यापुढील काळातही महिलांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले. कार्यक्रमात उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, फार्मइजीचे सहसंस्थापक डॉ. धवल शाह, हंड्रेड एक्स डॉट व्हीसीचे संस्थापक संजय मेहता, एसीटी ग्रँटसचे प्रवक्ते संदीप सिंघल, आयएमसीचे माजी अध्यक्ष राज नायर उपस्थित होते.

देशाच्या ग्रामीण भागासह शेतकर्‍यांच्या उन्नतीच्या अनुषंगाने सप्ताहामध्ये तरुणांनी विविध संकल्पना मांडल्या. उद्योग विभागामार्फतही यासाठी व्यापक पातळीवर उपाययोजना करण्यात येतील, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. आपले प्रॉडक्ट उद्योजक आणि शासनासमोर सादर करण्याची संधी तरुणांना मिळाल्याचे सांगत कौशल्य विकास राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सप्ताहाच्या आयोजनामगील भूमिका सांगितली.

स्वतंत्र महिला उद्योजक कक्षाची स्थापना

महाराष्ट्र राज्याने इनोव्हेशन इंडेक्समध्ये देशात दुसरा क्रमांक पटकावला. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कौशल्य विकास विद्यापीठ, आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. अशा विविध उपक्रमांमधून तरुणांमधील व्यावसायिकता, उद्योजकतेला चालना देण्यात येत असल्याचे कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी सांगितले.


हेही वाचा – मुंबई महापालिकेच्या ताफ्यात ५ इलेक्ट्रिक वाहने