महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह : विजेत्यांना मिळणार १५ लाखपर्यंतचे कार्यादेश, शासकीय खात्यांमध्ये काम करण्याची संधी

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहामध्ये देशभरातील १ हजार ८४६ स्टार्टअप्सचा सहभाग, अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

ncp leader nawab malik press allegation on bjp of temple land scam in maharashtra
राज्यभरात देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याचा उद्योग भाजपकडून सुरू - नवाब मलिक

तरुणांमधील नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणे, देशातील उद्योजकीय परिसंस्थेला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचं आयोजन केलं. राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागातंर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाला चांगला प्रतिसाद मिळाला असून देशभरातील १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी नोंदणी केली आहे. आरोग्यविषयक ३२०, शेतीविषयक २५२, शिक्षणविषयक २३८ अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पना सादर झाल्या असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या कामांचे कार्यादेश

तरुणांमधील नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणे, देशातील उद्योजकीय परिसंस्थेला चालना देणे हा या सप्ताह आयोजनामागील उद्देश असून सप्ताहातील उत्कृष्ट स्टार्टअप्सना राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये त्यांच्या नवसंकल्पनांचा लाभ देण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या कामांचे कार्यादेश देण्यात येतील, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाच्या या चौथ्या आवृत्तीसाठी १२ मे २०२१ पासून www.msins.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य, शासन, आरोग्य सेवा, स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता, स्वच्छ ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात देशभरातील स्टार्टअप्सनी अर्ज केले आहेत. २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून १ हजार ८४६ अर्ज प्राप्त झाले असून महाराष्ट्रातून सर्वाधिक ९४७ अर्ज प्राप्त झाले आहेत. आता या अर्जांची तज्ज्ञांकडून तपासणी केली जाईल आणि जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात टॉप १०० स्टार्टअपची यादी जाहीर केली जाईल. टॉप १०० स्टार्टअप्सना ९ ते १३ ऑगस्ट, २०२१ दरम्यान गुंतवणूकदार, तज्ज्ञ आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी मिळेल. कोरोना साथीमुळे सर्व सादरीकरण सत्रे ही ऑनलाईन पद्धतीने होतील. यातील विजयी २४ स्टार्टअप्सना त्यांच्या नवसंकल्पना शासनाच्या संबंधीत विभागात वापरण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या कामांचे आदेश देण्यात येतील, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

यंदाच्या स्टार्टअप सप्ताहामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ९४७ स्टार्टअप्सनी सहभाग घेतला आहे. त्यानंतर कर्नाटक २०२, दिल्ली ८७, गुजरात ५४, केरळ ६४, मध्य प्रदेश ३४, तामिळनाडू ८९, तेलंगणा ५६, उत्तरप्रदेश ७५, राजस्थान ३७, हरयाणा ३२ याप्रमाणे विविध २७ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील एकूण १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक ३२२ अर्ज पुण्यातून आले आहेत. तर मुंबई २१२, मुंबई उपनगर ७०, औरंगाबाद १९, कोल्हापूर १३, नागपूर ४२, नाशिक ५२, पालघर १३, रायगड २३, ठाणे ९७ याप्रमाणे विविध जिल्ह्यांमधून अर्ज प्राप्त झाले आहेत.

आरोग्यविषयक ३२०, कृषीविषयक २५२, शिक्षणविषयक २३८, गव्हर्नन्सविषयक ७२, कौशल्यविषयक ९४, स्मार्ट पायाभूत सुविधाविषयक १७६, परिवहनविषयक १२६, शाश्वत हरित उर्जाविषयक ५८, घनकचरा व्यवस्थापनविषयक ११०, पाणी व्यवस्थापनाबाबत ५१ तर इतर विविध विषयांबाबतच्या ३४९ स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी अर्ज केला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून तरुणांच्या नवसंकल्पनांना मोठ्या प्रमाणात चालना आणि प्रोत्साहन देण्यात येईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.