घरताज्या घडामोडीगणेशोत्सवासाठी मूर्तींची उंची ठरली!; सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

गणेशोत्सवासाठी मूर्तींची उंची ठरली!; सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

Subscribe

विसर्जनासाठीही यंदा नव्या अटींचा समावेश

मुंबई कोविड-१९ च्या संकटकाळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठीच्या गाईडलाईन्स राज्य सरकारमार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने याबाबतचा एक शासन निर्णय जारी केला आहे. गणेशोत्सव साधेपणाने कसा साजरा करता येईल यासाठीच्या मार्गदर्शन करणार्‍या या सूचना आहेत. महत्त्वाची सूचना म्हणजे घरगुती गणपतीच्या मूर्तींची उंची ही दोन फूट ठेवण्याची मर्यादा या अटीनुसार घालण्यात आलेली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करावा तसेच गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी काय खबरदारी घ्यावी यासाठीच्या सूचना गणेशभक्तांना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी बैठका घेतल्या होत्या. या बैठकातूनच घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उंचीची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ४ फुटांची मूर्ती तर घरगुती मूर्ती ही २ फुटांची असे बंधन घालण्यात आले होते. आज जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शकांमध्ये घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठीच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सूचना

मार्गदर्शकांमध्ये नमुद केल्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका व स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार आवश्यक परवानग्या घ्यावा लागतील. उत्सवाचे मंडप हे न्यायालयाचे आदेश आणि प्रशासनाच्या धोरणाशी सुसंगत असावे. सजावट करताना भपकेबाजी नसावी. सार्वजनिक उत्सवासाठी वर्गणी किंवा देणगी स्वेच्छेने मिळत असल्यास घ्यावी. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही हे पाहावे. जाहिराती आरोग्यविषयक किंवा सामाजिक संदेश देणार्‍या असतील हे पाहावे. गणेशमूर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील विसर्जनावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून विसर्जनाची गर्दी टाळता येईल व सर्वांनाच सुरक्षित राहता येईल. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम किंवा रक्तदान शिबिरे घेण्यास प्राधान्य द्यावे. आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम करताना गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करावे. श्रीगणेशाचे दर्शन ऑनलाईन, केबल, फेसबुक व वेबसाइटद्वारे करून देण्याची व्यवस्था करावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रिनिंगची पुरेशी व्यवस्था करावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भाविक मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे नियम पाळतील हे पाहावे. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.

घरगुती गणेशोत्सवासाठी सूचना

शक्यतो घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरीच करावे. ते शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे. गणेशाचे आगमन व विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करावी. गणेश मूर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील विसर्जनावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून विसर्जनाची गर्दी टाळता येईल व सर्वांनाच सुरक्षित राहता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -