Maharashtra Corona: राज्यात तिसऱ्या लाटेचा पीक पिरियड कधीपर्यंत आणि ओसरणार कधी? आरोग्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

राज्यातील ८५ टक्के रुग्ण एसिम्प्टोमॅटिक आहेत. १५ टक्के ते १३ टक्के रुग्णांना सौम्य, मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. १ टक्के रुग्ण आयसीयू आणि २ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

maharashtra third corona wave health minister rajesh tope
Maharashtra Corona: राज्यात तिसऱ्या लाटेचा पीक पिरियड कधीपर्यंत आणि ओसरणार कधी? आरोग्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची आज बैठक पार पडली. दुपारी ३.३० ते ५.३० तब्बल दोन तासांच्या बैठकीमध्ये पाच राज्यांचा आरोग्यमंत्री मनसुख मांडवियांनी आढावा घेतला. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील तिसरी लाटेचा पीक पिरियड कधीपर्यंत असेल आणि ओसरणार कधी याबाबत सांगितले. तसेच त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा दिला आणि आरोग्य यंत्रणेवर कोणताही अतिरिक्त ताण नसल्याचे सांगितले. राज्यात जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येचा वेग कायम राहिल आणि त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येचा वेग ओसरेल असे राजेश टोपे म्हणाले.

राज्यात १ लाख ७३ हजार सक्रीय रुग्ण

राजेश टोपे म्हणाले की, ‘आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवियांसोबत ३. ३० ते ५.३० पर्यंत दोन तास बैठक झाली. यामध्ये पाच राज्यांच्या आढावा आणि त्यांनी प्रेझेंटेशन दिले. तसेच राज्याने काय केले पाहिजेत? याबाबत सांगितले. राज्यात १ लाख ७३ हजार सक्रीय रुग्ण आहेत. त्यामधील आयसीयूमध्ये १ हजार ७११ म्हणजे १ टक्के रुग्ण आणि ऑक्सिजनवर ५ हजार ४०० लोकं म्हणजेच २ टक्के रुग्ण आहेत. तसेच १३ टक्के लोकं सौम्य आणि मध्यम स्थितीतील आहेत. ३८ हजार ८५० आयसीयू बेड्सपैकी १ हजार ७१० ऑक्युपाईड आहेत. तर १६ हजार व्हेटिंलेटर असून ७०० रुग्ण व्हेटिंलेटवर आहे. त्यामुळे सध्या उपलब्धतेच्या तुलनेत ऑक्युपाईडची क्षमता कमी आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण नाही. केंद्रीय मंत्र्यांनी चाचण्या, लसीकरण वेगाने वाढवण्यास सांगितले आहे.’

होम आयसोलेशन किट दिले जाणार

पुढे टोपे म्हणाले की, ‘राज्यातील ८५ टक्के रुग्ण एसिम्प्टोमॅटिक आहेत. १५ टक्के ते १३ टक्के रुग्णांना सौम्य, मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. १ टक्के रुग्ण आयसीयू आणि २ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. सध्या ज्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत ते होम आयसोलेटेड होत आहेत. त्यांच्यासाठी होम आयसोलेशन किट दिले जाणार आहे. त्याच्यामध्ये २० मिली सॅनिटायझर, १० मास्क, महितीपुस्तिका, १० पॅरासिटीमॉलच्या गोळ्या, २० मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्या असे हे होम आयसोलेशन किट दिले जाणार आहेत.’

पुढच्या महिन्याभरात मोठे कार्यक्रम टाळा

‘दरम्यान १५ ते १८ वयोगटातील लसीकरणात, बूस्टर डोस देण्याबाबत राज्याने अधिक जास्त प्रगती करावी, अशी अपेक्षा केंद्राने व्यक्त केली. राज्यात आतापर्यंत ८९ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे, तर ६० टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरण कमी प्रमाणात झाले आहे. ज्या जिल्ह्यात चांगले लसीकरण झाले आहे, त्या ठिकाणी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण, मृत्यूदर, आयसीयू, ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे. जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णसंख्येचा वेग कायम राहिल त्यानंतर तो ओसरत जाईल, असे जागतिक आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे सर्व नागरिक आणि पालकांनी समजून घ्यावे आणि सहकार्य करावे. पुढच्या महिन्याभरात मोठे कार्यक्रम टाळा,’ असे आवाहन राजेश टोपेंनी केले.


हेही वाचा – Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरोदर महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट, केंद्राचा मोठा निर्णय