कोविड काळात सर्वाधिक रुग्ण सुविधा देणारा महाराष्ट्र अव्वल

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळंबोलीतील कोविड केंद्राचे लोकार्पण

CoronaVirus

सिडकोने कोविड काळात अगदी कमी वेळेत सर्व सोयींनी युक्त अशा आखीव रेखीव उभारण्यात आलेल्या कळंबोलीतील सर्व उपकरणांनी सज्ज कोविड सेंटरचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कोरोनाच्या संकटात सर्व सुविधांनी युक्त रुग्णालये केवळ महाराष्ट्रानेच सुरू केली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. भारतीय कापूस निगमच्या गोदामांमध्ये सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कोविड समर्पित आरोग्य केंद्राचे पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरण व ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला.

सिडकोने उभारलेल्या कळंबोली आणि कांजूरमार्ग येथील कोविड आरोग्य केंद्रांचे लोकार्पण मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल माध्यमाद्वारे करण्यात आले. कोविड आरोग्य केंद्रांचे लोकार्पण व सिडकोच्या इन्व्हेस्टमेन्ट अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समीट (आभासी-व्हर्च्युअल) चा शुभारंभही यावेळी पार पडला.

नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, महापालिकेचे नगरसेवक, आयुक्त गणेश देशमुख, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलाश शिंदे, पालिका उपायुक्त सचिन पवार, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सिडको अधिकारी आदी उपस्थित आहेत. सुदृढ आरोग्यासाठी ज्याप्रमाणे चौरस आहार आवश्यक असतो, त्याप्रमाणेच विकाससुद्धा चौफेर आणि सर्वसमावेशक असावा, भविष्यातील गरजा ओळखून विकासकामांचे नियोजन करताना होणारी कामे ही सुबक, दर्जेदार आणि देखणी असावीत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.