मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचे चटके आणि रात्रीच्या वेळी थंडी असा नागरिकांना अनुभव मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या तापमानाच्या वाढीत आता पुन्हा घट होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या पाच दिवसात हवामानात मोठे बदल होणार असून वाढलेल्या किमान तापमानाच्या पाऱ्यात आता 1-2 अंशांनी घट होणार आहे. तर कमाल तामपानात वाढ होणार आहे, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तापमानामध्ये घट होणार आहे. (Maharashtra Weather change in temperature of state, there will be drop in mercury)
सध्या वातावरणात पहाटे गारठा कायम असून शुष्क व कोरडे हवामान आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा आता 15-23 अंशांपर्यंत नोंदवला जात आहे. शुक्रवारी (ता. 25 जानेवारी) मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात किमान तापमानात वाढ झाल्याची नोंद झाली. बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 11 ते 21 अंशांपर्यंत होता. मुंबईतील कुलाबा हवामान केंद्रात 21.2 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. तर, सांताक्रूझ हवामान केंद्रात 19.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात 17.8 अंश तर लातूरमध्ये 19.9 अंश तापमान नोंदवण्यात आले. पुण्यातही तापमानाचा पारा 14 ते 16 अंशापर्यंत नोंदविण्यात आला होता.
हेही वाचा… Narendra Chapalgaonkar Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचे निधन
परंतु, मराठवाड्यात येत्या पाच दिवसात तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होणार असून कोरडे व शुष्क वारे वाहणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यातही किमान व कमाल तापमानात बदल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसांमध्ये राज्यात कोरडे व शुष्क वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार आहेत. परिणामी तापमानावर त्याचा परिणाम होणार आहे. तर, भारतीय हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य भारतात सध्या थंडीला पोषक वातावरण तयार झाले असून येत्या तीन दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होणार आहे. त्यामुळे आता राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा गारठ्याचा सामना करावा लागणार आहे.