पुढील दोन ते तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी वाढली असून, नागरिकांनी उबदार कपड्यांना पसंती दिली आहे. मात्र, एकीकडे थंडी असताना दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी वाढली असून, नागरिकांनी उबदार कपड्यांना पसंती दिली आहे. मात्र, एकीकडे थंडी असताना दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (maharashtra weather chenges rain in state for the next two days)

उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी देखील काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातच आता 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असणार आहे. तसेच, मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवली होती. तसेच किमान तापमानात किरकोळ वाढ होणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात सातत्याने होणाऱ्या तापमानातील बदलांमुळे रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खरीप हंगामात आधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा आता रब्बी हंगामातील पिकांवर आहेत. मात्र, हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.


हेही वाचा – देशातील टॉप १० मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर; एकनाथ शिंदे कितव्या स्थानावर?