मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात विविध बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री गारवा तर दिवसा उन्हाचे चटके यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या मुंबई व राज्याच्या इतर भागांमध्ये गारवा अनुभवायला मिळत आहे. पण येत्या 24 तासांमध्ये राज्याच्या किमान तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे आता नागरिकांना मे महिन्याच्या आधीच उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. तर, पश्चिम हिमालयीन भागात दोन वेगवेगळ्या प्रकारचे पश्चिमी चक्रावात तयार झाले असून येत्या चार दिवसात उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. (Maharashtra Weather Meteorological Department predicts that heat will increase in state)
दक्षिणेकडेही नैऋत्य मोसमी पावसाचा जोर कायम असून दक्षिणेकडील राज्यांना जोरदार पाऊस झोडपणार आहे. याचाच परिणाम महाराष्ट्रावर होणार असून तापमानात येत्या पाच दिवसात चढ उतार पाहायला मिळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान वाढलेले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी 15 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान नोंदवले जात आहे. तर कमाल तापमानही दोन ते तीन अंशांनी वाढले असून मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात 35 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाची नोंद होत आहे. राज्यात पहाटे गारठा, धुक्याची चादर कायम असली तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. कडाक्याची थंडी गायब असतानाच कमाल तापमान 33 अंशांच्या पुढे गेले आहे.
हेही वाचा… Coastal Road : कोस्टल रोडच्या उत्तर-दक्षिण वाहिनीवरून 21 हजारांपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवत होता. आता दक्षिण व उत्तरेकडील राज्यांमधील हवामानाच्या प्रभावाने राज्यातील हवामानात बदल होत आहेत. राज्यात बहुतांश ठिकाणी पहाटे किमान तापमान घटलेले असले तरी गारठा कमी झाला आहे. उन्हाचा चटका कायम असून कमाल तापमानातही काही अंशी वाढ झाल्याचे नोंदवले गेले आहे. मुंबईतही हिवाळ्यात 21 ते 22 अंशापर्यंत तापमान नोंदविण्यात आले आहे. दक्षिण भारतातील ईशान्य मोसमी वाऱ्यांचा हंगाम संपत आला आहे. तर पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे ईशान्य अरबी समुद्र पासून दक्षिण राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या सर्व परिस्थितीचा हवामानावर परिणाम होत आहे.